सैफ अली खानवर हल्ला करणारा बांगलादेशी घुसखोर असल्याचा संशय, हल्लेखोराबद्दल पोलिसांनी केली महत्त्वाची माहिती उघड
अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी रात्री वांद्रे येथील निवासस्थानी घरात शिरलेल्या चोराने जीवघेणा हल्ला केला होता. या चोराने सैफच्या अंगावर धारदार चाकूने सहा वार केले होते. चाकूचा पुढचा अडीच इंचाचा सैफच्या पाठीत रुतून बसला होता. शिवाय, त्याच्या मानेवरही खोल जखम झाली होती. घटनेनंतर सैफला तातडीने लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात होतं. तर, दुसरीकडे मुंबई पोलीस हल्लेखोराचा शोध घेत होते.
शनिवारी मध्यरात्री, मुंबई पोलिसांनी आणि ठाणे पोलिसांनी सैफच्या आरोपीला ठाण्यातल्या कासारवडवलीतून ताब्यात घेतलं. यानंतर त्याला पुढील तपासासाठी खार पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं होतं. आरोपीला अटक केल्यावर मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन त्याचं नाव, तसेच प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी घुसखोर असावा असा संशय व्यक्त केला आहे. शिवाय पोलिसांनी पत्रकार परिषदेत आरोपीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
सैफ अली खानच्या हल्लेखोराला मुंबई पोलिसांनी अखेर ठाण्यातून घेतलं ताब्यात, चौकशी सुरू
पत्रकार परिषदेत पोलिसांनी आरोपीबद्दल माहिती सांगताना सांगितले की, आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद असं असून हा आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याची शक्यता आहे. तो ३० वर्षांचा आहे. आरोपीकडे भारतीय ओळखपत्रे नसल्याने तो भारतात अवैधरित्या वास्तव्यात होता, असा संशय आहे. या दृष्टीने पुढील तपास सुरु आहे. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला वांद्रा न्यायालयात हजर करत पोलिस कस्टडीची मागणी केली जाईल. एका नामांकित कंपनीत जॉब करत असलेला आरोपी ठाण्याच्या लेबर कँपमध्ये राहत होता. जंगलासारखे खूप झाडे- झुडुपे असलेल्या परिसरात आरोपी झोपला होता.
त्याची शरीरयष्टी खूपच मजबूत असल्यामुळे त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी चार ते पाच पोलिसांची ताकद लागली होती. आरोपी नामांकित कंपनीत लेबर कॅम्पमध्ये काम करण्यापूर्वी वांद्रे परिसरात एक हॉटेलमध्ये कामाला होता. तिथे त्याला ‘एम्प्लॉय ऑफ द इयर पुरस्कार’ही मिळाला होता. वांद्रे परिसरात उच्चभ्रू वस्ती आहे, त्यामुळे सैफच्या असे नाही पण या विभागात कोणत्याही उच्चभ्रू व्यक्तीच्या घरात चोरी केल्यास खूप पैसे मिळतील असे त्याला वाटले. पैशाची गरज असल्याने तो चोरी करायला तिथे गेल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.
सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मध्यप्रदेशातून एकाला केली अटक
परिमंडळ ६ आणि परिमंडळ ९ अशा दोन झोनच्या टीमने एकत्र येऊन शनिवारी रात्री मोहम्मदला पकडण्याचं सर्च ऑपरेशन केलं. यात सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपास करुन मुंबई पोलिस आणि ठाणे पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले. या सर्व ऑपरेशनमध्ये उपायुक्त पोलिस अधिकारी ही सहभागी होते.