Sairat Re- Re-released
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत एक इतिहास रचला आहे. १०० कोटींपेक्षा सर्वाधिक कमाई करणाऱ्या या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रेक्षकांनाही वेड लावले. चित्रपटातील हृदयस्पर्शी प्रेमकथा आणि कलाकारांच्या नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांना विशेष भावला होता. अजय -अतुल यांच्या दमदार संगीतानेही चित्रपटाच्या लोकप्रियतेला हातभार लावला. संपूर्ण जगात चित्रपटातील गाणी प्रचंड गाजली. या अभूतपूर्व यशानंतर ‘सैराट’आता पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर री- रिलीज झाला आहे. त्यामुळे आता ‘सैराट’च्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि परश्याच्या प्रेमकहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.
चित्रपट बॉक्स ऑफिसवर री-रिलीज झाल्यानंतर अभिनेता आकाश ठोसरने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आकाश म्हणतो, “सैराट!!! पिक्चर शूट करतानाचा पूर्ण प्रवासच आमच्यासाठी स्वप्नगत होता आणि पिक्चर रिलीज झाल्यानंतरचा हा ९ वर्षांचा प्रवास तुम्ही बघतच आलाय. आज ९ वर्षांनी सैराट परत रिलीज होतोय याचा आम्हाला आज खरच खुप आनंद होत आहे. परत मोठ्या स्क्रीनवर आर्ची- परश्या म्हणून तुम्हाला भेटायला येतोय आणि हे शक्य झाल ते फक्त नागराज आण्णामुळे! ‘सैराट’मुळे आमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, आणि त्याबद्दल आम्ही आण्णांचा कायम ऋणी राहीन. आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रेमासाठी धन्यवाद! तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन परत “सैराटमय” व्हायला विसरू नका !!!”
आकाश ठोसरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये चाहत्यांसोबत शुटिंग दरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये आकाशसोबत रिंकूही पाहायला मिळत आहेत. दोघांचे वेगवेगळ्या सीन्स मधले हे फोटोज् आहेत. दरम्यान, आकाशने शुटिंग दरम्यानच्या शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेट्सचा वर्षाव केला जात आहे. चाहत्यांकडून अवघ्या काही तासातच लाईक्सचा वर्षाव करण्यात आला आहे. आकाशने शेअर केलेल्या फोटोंवर कमेंट करत चाहते म्हणतात की, ‘महाराष्ट्रातील नंबर १ फेमस चित्रपट’, ‘मी पुन्हा एकदा ‘सैराट’चित्रपट पाहण्यासाठी तयार आहे’, ‘सैराट २ काढा की…’, ‘चित्रपट पाहिल्यानंतरच्या प्रतिक्रिया शब्दात मांडण्यासारखी नाही’, ‘तुमचा अभिनय आणि तुमच्या साधेपणामुळेच असा पिक्चर परत कधीच होऊ शकत नाही.’, ‘जबरदस्त चित्रपट’, ‘कायमच फेव्हरेट चित्रपट अन् कपलही…’ अशा अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया चाहत्यांनी आकाशच्या पोस्टवर केल्या आहेत.