प्रेक्षकांची उत्सुकता आता संपली आहे. कारण मॅडॉक फिल्म्सने ‘साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ’ (Sajini Shinde Ka Viral Video) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. हा ट्रेलर उत्कंठावर्धक आहे. ‘साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ’ चित्रपटाचा ट्रेलर तुम्हाला साजिनी शिंदे (राधिका मदन) कशी आणि का बेपत्ता झाली आणि तिच्या बेपत्ता होण्यास कोण जबाबदार आहे याचा अंदाज लावण्यास भाग पाडतो. या वर्षातील सर्वात मोठा थरारपट म्हणून ओळखला जाणारा, हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील उदयोन्मुख कलागुणांना वाव देताना दिसणार आहे. तसेच हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीचा उत्तम मिलाफ यात पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटात राधिका मदन, निम्रत कौर, भाग्यश्री, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, शशांक शिंदे आणि सुमीत व्यास यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाची कथा एका तरुण भौतिकशास्त्र शिक्षिकेची आहे जी रहस्यमय परिस्थितीत गायब होते. एक अनुभवी आणि अत्यंत कुशल गुन्हे शाखेची अन्वेषक, बेला (निम्रत कौर) हरवलेल्या साजिनीला शोधण्यासाठी केस हाती घेते. बेला प्रयत्नांची पराकाष्टा करत असते. डोळ्यासमोर धुसर असं सर्व दिसत असतानाही ठोस असे तिच्या हाती काही लागत नाही आणि सत्य शोधण्यासाठी ती काळाशी झुंज देत असताना, अनपेक्षित वळणांची मालिका उलगडते.
मिखिल मुसळे यांनी दिग्दर्शित केलेला ट्रेलर प्रेक्षकांसाठी कथेला उत्तम प्रकारे सादर करतो, त्याचा खुलासा न करता खूप काही सांगून जातो. ते सांगतात की, “कथा एका सामाजिक थरारपटाच्या सेटअपमध्ये तयार करण्यात आली आहे आणि त्यात हिंदी आणि मराठी कलाकारांच्या प्रतिभावान समूहाचे उत्तम मिश्रण आहे. या सर्वांनी हे सुनिश्चित केले आहे की त्यांची उल्लेखनीय कामगिरी केंद्रस्थानी आहे. आम्हाला आशा आहे की चित्रपटाला खूप प्रेम मिळेल कारण त्यांनी सर्वोत्कृष्ट काम केले आहे.”
मॅडॉक फिल्म्सचे निर्माते दिनेश विजन म्हणाले, “मॅडॉकमध्ये आमचा कंटेंट वितरित करण्यावर विश्वास आहे आणि पुन्हा एकदा ‘साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ’सह आम्ही तेच केले आहे. हा एक सामाजिक थरारपट आहे जो तुम्हाला खिळवून ठेवतो आणि आम्हाला आशा आहे की प्रेक्षकांना तो पाहताना आनंद मिळेल.”
मिखिल मुसळे आणि परिंदा जोशी यांनी चित्रपटाची कथा आणि पटकथा लिहिली असून अतिरिक्त पटकथा आणि संवाद अनु सिंग चौधरी आणि क्षितिज यांनी दिले आहेत. ‘साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ’ 27 ऑक्टोबर 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.