फोटो सौजन्य - Social Media
स्टार प्लस नेहमीच सामाजिक आणि भावनिक विषयांना स्पर्श करणाऱ्या मालिकांमुळे चर्चेत राहिला आहे. आता या वाहिनीवर आणखी एक प्रभावी फिक्शन ड्रामा ‘संपूर्णा’ प्रेक्षकांसमोर येत आहे. खास बाब म्हणजे या शोचा ट्रेलर कोणताही साधा सेलिब्रिटी नव्हे, तर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारे बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते सोनू सूद लाँच करणार आहेत.
सोशल मीडियावर ट्रेलर शेअर करताना सोनू सूद म्हणाले “गणेश चतुर्थीच्या उत्सवात आपण आनंदात रंगतो, पण आपल्या आजूबाजूला अनेक स्त्रिया आहेत ज्या अशा संघर्षांना सामोरं जातात, ज्यांची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. हा ट्रेलर पाहताना मी भावूक झालो, कारण ही केवळ एक कथा नाही तर आपल्या समाजाचं वास्तव आहे. या वर्षी माझी एकच प्रार्थना आहे की बाप्पा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अडथळे दूर करो.” ते पुढे म्हणाले की, #Sampoorna हा फक्त मनोरंजनासाठीचा शो नसून, एक शक्तिशाली संदेश देणारा प्रवास आहे. ही कथा अनुभवणं आणि समजून घेणं प्रत्येकासाठी आवश्यक आहे. हा नवा शो ८ सप्टेंबरपासून दररोज संध्याकाळी ७:३० वाजता स्टार प्लसवर प्रसारित होणार आहे.
शोच्या कथानकाचा केंद्रबिंदू आहे मिट्टी, जी सात वर्षांपासून विवाहित असून चार वर्षांच्या मुलाची आई आहे. वरकरणी तिचं आयुष्य परिपूर्ण दिसतं, परंतु अचानक सर्व काही बदलतं जेव्हा तिच्या नवऱ्याला, प्रतिष्ठित डॉक्टर डॉ. आकाश याला गंभीर प्रकरणात अटक होते. आकाश स्वतःला निर्दोष सांगतो आणि त्याला अडकवलं गेलं असल्याचा दावा करतो. या घटनेमुळे मिट्टीच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळतं.
कथेत आणखी एक महत्त्वाची व्यक्तिरेखा म्हणजे नयना स्वाभिमानी, बेधडक आणि प्रेमाच्या शोधात असलेली तरुणी. तिच्या आयुष्यातील घडामोडींमुळे कथानक अधिक नाट्यमय होतं. प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो. एका आदरणीय डॉक्टरवर इतका गंभीर आरोप का करण्यात आला? त्यामागे दडलंय तरी काय सत्य? सोनू सूद यांच्या उपस्थितीमुळे या शोच्या संदेशाला अधिक वजन प्राप्त होतं. समाजाशी निगडित मुद्द्यांवर ठाम भूमिका घेणारा हा अभिनेता ‘संपूर्णा’सारख्या शोसाठी अगदी योग्य चेहरा ठरतो. ‘संपूर्णा’ हा फक्त एक टेलिव्हिजन शो नसून, अनेक स्त्रियांच्या दैनंदिन जीवनातील संघर्ष, वेदना आणि त्यांच्या जिद्दीचं वास्तव दर्शन घडवतो.