फोटो सौजन्य - Social Media
‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट १२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, त्याबद्दल मोठी चर्चा रंगली आहे. या चित्रपटात प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक अशी बलाढ्य कलाकारांची फळी झळकणार आहे. मात्र, सर्वांत मोठे आकर्षण ठरत आहे ते म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत यांची जोडी. या जोडीची केमिस्ट्री आधीपासूनच प्रेक्षकांना आवडते. पडद्यावर त्यांचा सहजसुंदर आणि नैसर्गिक अभिनय पाहून ते खऱ्या आयुष्यातलेच पात्र असल्याचा भास होतो, आणि हाच नैसर्गिकपणा दिग्दर्शक आदित्य इंगळे यांच्या नजरेत भरला.
दिग्दर्शक आदित्य इंगळे आपल्या निवडीबद्दल सांगतात की, “मी एकदा उमेश आणि प्रियाकडे जेवायला गेलो असताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बारकाईनं अभ्यास केला. प्रियाची शिस्त आणि उमेशचा सहज, गंमतीदार स्वभाव बघून मला वाटलं की, हे दोघं आशय आणि ऋतिकाच्या भूमिकांसाठी अगदी परफेक्ट आहेत. इतकं साम्य त्यांच्या वागण्यात होतं की दुसरा कोणताही पर्याय माझ्यासमोर राहिला नाही. मी त्यांना कथा ऐकवली, तेव्हा प्रिया गंमतीत म्हणाली ‘तू आधी मला बघितलं आणि मग हे पात्र लिहिलं ना?’ पण प्रत्यक्षात ही पात्रं आधीच लिहिलेली होती आणि त्यात उमेश-प्रिया अगदी फिट बसले.”
या चित्रपटात गिरीश ओक आणि निवेदिता सराफ ही लोकप्रिय जोडीदेखील झळकणार आहे. या दोन जोड्यांच्या अप्रतिम अभिनयामुळे चित्रपट रंगतदार होणार आहे, अशी खात्री प्रेक्षकांना आहे. गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाची कथा समीर कुलकर्णी यांनी लिहिली असून, दिग्दर्शनाची धुरा आदित्य इंगळे यांनी सांभाळली आहे.
‘बिन लग्नाची गोष्ट’ या नावावरूनच हा चित्रपट नातेसंबंध, आयुष्याचा प्रवास आणि नात्यातील गमती-जमती सांगणारा असल्याचे दिसून येते. प्रिया-उमेशच्या नैसर्गिक केमिस्ट्रीसोबत गिरीश ओक आणि निवेदिता सराफ यांच्या अनुभवी अभिनयाचा संगम प्रेक्षकांना अविस्मरणीय अनुभव देणारा ठरणार आहे. त्यामुळे १२ सप्टेंबर रोजी हा चित्रपट नेमका काय नवा अनुभव देतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.