कलाकृतीला पुरस्काररूपी कौतुकाची थाप मिळणे ही प्रत्येकासाठी अभिमानाची गोष्ट असते. या कौतुकानेच अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळत असते. मराठी चित्रपटसृष्टीतील उत्तम कलाकृतींचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘फक्त मराठी सिने सन्मान’ (Fakt Marathi Cine Sanman) सोहळयामध्ये ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’ आणि ‘बहुरूपी प्रोडक्शन्स’ यांची निर्मिती असलेल्या ‘सोयरीक’ चित्रपटाने सर्वाधिक नामांकने मिळवली आहेत. ‘फक्त मराठी सिने सन्मान’ पुरस्कार सोहळयाच्या नामांकनांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून येत्या २७ जुलैला हा सोहळा रंगणार आहे.
या सोहळ्यात मकरंद माने दिग्दर्शित ‘सोयरीक’ (Soyrik) या चित्रपटाला एक दोन नव्हे तर तब्बल ११ विभागात (11 Nominations To Soyrik Movie) नामांकने मिळाली आहेत. ‘सोयरीक’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह मकरंद माने (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक), मानसी भवाळकर (सर्वोत्कृष्ट अभिनेत्री), छाया कदम (सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ), शशांक शेंडे (सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता), मकरंद माने (सर्वोत्कृष्ट कथा ), मकरंद माने (सर्वोत्कृष्ट पटकथा), मकरंद माने (सर्वोत्कृष्ट संवाद), विजय गावंडे (सर्वोत्कृष्ट संगीतकार), अमिता घुगरी (सर्वोत्कृष्ट गायिका), वैभव देशमुख (सर्वोत्कृष्ट गीतकार) या विभागामध्ये नामांकने मिळाली आहेत.
[read_also content=”ओबीसींना बांठिया आयोगानुसार राजकीय आरक्षण लागू; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश https://www.navarashtra.com/india/applying-political-reservation-to-obcs-as-per-banthia-commission-directive-of-supreme-court-nrgm-306246.html”]
चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने सांगतात, आम्हाला मिळालेली नामांकने आमच्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. लग्नाविषयी, त्यापेक्षाही सहजीवनाविषयी आजची तरुणाई जास्त प्रॅक्टिकली विचार करतेय. पण, या व्यावहारिकतेमध्ये व्यक्तिस्वातंत्र्य किती जपलं जातंय, एकमेकांच्या अपेक्षांचा, व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर होतोय का? यावर सोयरीक चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे.
येत्या रविवारी झी टॉकीजवर ‘सोयरीक’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रंगणार आहे.