फोटो सौजन्य - Social Media
भारतीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध आणि दिग्गज संगीतकार प्रीतम यांच्यासोबत अलीकडेच एक गंभीर घटना घडली आहे. त्यांच्या ऑफिसमधून तब्बल ४० लाख रुपयांची रोख रक्कमेची बॅग चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, ही बॅग चोरी करण्याचा संशय प्रीतम यांच्या ऑफिसमधीलच एका कर्मचाऱ्यावर व्यक्त करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली असून चोरीचा तपास वेगाने सुरू आहे. प्रीतम यांच्या ऑफिसचे व्यवस्थापक विनीत छेडा यांनी या घटनेची तक्रार मालाड पोलीस ठाण्यात नोंदवली असून संबंधित कर्मचाऱ्याविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, चोरी झालेल्या बॅगेत महत्त्वाच्या कामांसाठी जमा केलेली मोठी रक्कम होती. सध्या पोलिस पथक आरोपीचा शोध घेत असून या प्रकरणाच्या पुढील तपासाची प्रतीक्षा आहे. तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी ऑफिसच्या कामासाठी ४० लाख रुपये आणले गेले होते. व्यवस्थापक विनीत यांनी हे पैसे ऑफिसमध्ये ठेवले होते. त्यावेळी कर्मचारी आशिष सयाल तिथे उपस्थित होता. नंतर विनीत काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या घेण्यासाठी प्रीतम यांच्या घरी गेले.
विनीत घरी परतल्यानंतर ऑफिसमधून पैशांचा बॅग गायब असल्याचे समोर आले. इतर कर्मचाऱ्यांनी सांगितले की, आशिषने ती बॅग घेतली असून तो ती प्रीतम यांच्या घरी पोहोचवणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर आशिषचा फोन बंद येऊ लागला. व्यवस्थापक विनीत यांनी आशिषच्या घरी जाऊन पाहिले, परंतु तो तिथेही सापडला नाही. आशिषशी कोणताही संपर्क होऊ न शकल्याने प्रीतम यांच्या व्यवस्थापकाने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे. अद्याप या प्रकरणी प्रीतम यांचा कोणताही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
प्रीतम हे भारतीय संगीत उद्योगातील आघाडीचे संगीतकार, गायक आणि म्युझिक डायरेक्टर आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवले गेले आहे. ते मागील अडीच दशकांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ (KK), सोनू निगम, अरिजित सिंग तसेच आतिफ अस्लमसह अनेक सुप्रसिद्ध गायकांसोबत काम केले आहे. त्यांनी चाल तसेच संगीतबद्ध केलेले जवळजवळ सर्वच गाणी सुप्रसिद्ध आहेत.