Sunny deol Bank notice withdrawn : बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) अभिनेता सनी देओलच्या (Sunny Deol) जुहू इथल्या बंगल्याच्या लिलावाची नोटीस 24 तासांत मागे घेतली. बँकेने सोमवारी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देत तांत्रिक कारणांमुळे ही नोटीस मागे घेतली जात असल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे सनी देओलच्या मालमत्तेचा लिलाव होणार नाही असंही सांगण्यात आलं आहे.
यापूर्वी रविवारी प्रसिद्ध झालेल्या नोटीशीनुसार, सनी देओलने 56 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, जे त्याने फेडले नाही. कर्ज न भरल्याने बंगल्याच्या लिलावाची तारीख 25 सप्टेंबर देण्यात आली होती. बँकेने सनी देओलच्या कर्जवसुलीच्या नोटीशीची जाहिरातही प्रसिद्ध केली होती. यामध्ये सनी देओलचे जामीनदार म्हणून वडील धर्मेंद्र यांचे नावही लिहिले होते.बॉलिवूड अभिनेता आणि पंजाबच्या गुरुदासपूरमधील भाजप खासदार सनी देओल सध्या गदर-2 सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाने जवळपास 400 कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, 56 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड न केल्याने बँकेने सनी देओलला नोटीस बजावली होती. नोटीस मागे घेतल्याची माहिती बँक ऑफ बडोदाने वर्तमानपत्रात दिली आहे. तसेच 20 ऑगस्ट रोजी बँकेने वृत्तपत्रांमध्ये थकबाकी भरण्याबाबतही नोटीस प्रसिद्ध केली होती
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी उपस्थित केला प्रश्न
बँकेच्या या निर्णयावर आता काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी प्रश्न उपस्थित केला आहे – लिलाव थांबवण्याची तांत्रिक कारणे कुठून आली? असा सवाल जयराम रमेश यांनी केला आहे.
जयराम रमेश यांनी ट्विट केले आहे, “रविवारी दुपारी बँक ऑफ बडोदाने भाजप खासदार सनी देओलचे जुहू इथले निवासस्थान ई-लिलावासाठी ठेवले असल्याचं संपूर्ण देशाला कळलं. त्यांनी बँकेकडून घेतलेले 56 कोटी रुपयांचे कर्ज परत केलेले नाही. त्यामुळे ही लिलावाची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, सोमवारी सकाळी 24 तासांपेक्षा कमी कालावधीत बँक ऑफ बडोदाने ‘तांत्रिक कारणांमुळे’ लिलावाची नोटीस मागे घेतली आहे. ही ‘तांत्रिक कारणे’ कशामुळे उद्भवली याचे आश्चर्य वाटते?” असं जयराम रमेश यांनी ट्विटरमध्ये म्हटलं आहे.
सनी देओल गुरुदासपूरचा भाजप खासदार
सनी देओलचे अधिकृत नाव अजय सिंग देओल आहे. ते 2019 पासून पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत. त्यांनी तत्कालीन काँग्रेस नेते सुनील जाखड यांचा पराभव केला. याआधी अभिनेते विनोद खन्ना या जागेवरून भाजपचे खासदार होते.