मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार आणि प्रभावी अभिनयाने ठसा उमटवणारे अभिनेते सयाजी शिंदे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आपल्या वाढदिवसाच्या औचित्याने त्यांनी नवीन चित्रपटाची घोषणा केली असून त्याचे नाव आहे ‘तांबव्याचा विष्णूबाळा’. हा चित्रपट सातारा जिल्ह्यातील डोंगराळ भागातील तांबवे गावावर आणि तेथील घटनांवर आधारित आहे. कथेचा केंद्रबिंदू आहे गावातील विष्णू बाळा पाटील यांचा संघर्षमय प्रवास! ज्यात रक्तरंजित प्रसंग, सूडनाट्याचा थरार आणि भावनिक लढा आहे.
या चित्रपटात सयाजी शिंदे स्वतः विष्णूबाळाची मुख्य भूमिका साकारणार असून, मराठीसह हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषांमध्येही हा भव्यदिव्य चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासोबतच इतर राज्यांतील प्रेक्षकांनाही ही कथा अनुभवता येणार आहे. चित्रपटाची निर्मिती विश्वविनायक सिनेमॅटिक सफारी फिल्म एलएलपी या बॅनरखाली होत असून, लेखन अरविंद जगताप यांनी केले आहे. दिग्दर्शनाची धुरा ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटातून यश मिळवलेले दिग्दर्शक अनुप जगदाळे सांभाळत आहेत. निर्मितीची जबाबदारी मनोहर जगताप यांनी घेतली आहे. दिग्दर्शक अनुप जगदाळे यांच्या मते, प्रेक्षकांना काहीतरी वेगळा आणि भव्य अनुभव द्यायचा होता, आणि सयाजी शिंदे यांच्या सोबतीने ही सत्यकथा प्रभावीपणे सादर करण्याची संधी मिळाली आहे.
कथेच्या मध्यभागी आहे गावातील जुनी भाऊबंदकी आणि श्रेयवादातून निर्माण झालेला कटू वाद. दोन सख्ख्या चुलत भावांमध्ये निर्माण झालेला संघर्ष इतका विकोपाला जातो की त्याचे परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतात. या अन्यायाचा बदला घेण्यासाठी विष्णूबाळा उभा राहतो आणि त्याचा हा प्रवास रक्तरंजित, तडजोड न करणारा आणि अचंबित करणारा असतो. चित्रपटात या प्रवासातील प्रत्येक टप्पा तितक्याच नाट्यमयतेने दाखवला जाणार आहे. २००१ साली ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ नावाचा एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यातही सयाजी शिंदे महत्त्वाच्या भूमिकेत होते. मात्र, नव्या आवृत्तीत अधिक आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाचे छायाचित्रण, दमदार कलाकारांचा संच आणि विस्तृत सादरीकरण यामुळे कथा अधिक प्रभावीपणे पडद्यावर येणार आहे.
सयाजी शिंदे म्हणाले की, ग्रामीण भागातील सत्यकथा प्रेक्षकांच्या मनात खोलवर भिडतात आणि ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण ठरेल. स्थानिक बोली, रानटी वातावरण, गावातील नाती-वैमनस्य आणि न्यायासाठीचा झगडा, हे सर्व घटक चित्रपटात वास्तवतेने मांडले जातील. प्रेक्षकांना थरार, भावना आणि संघर्ष यांचा संगम अनुभवायला मिळेल, असा त्यांचा विश्वास आहे. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार असून, प्रदर्शित तारखेची घोषणा लवकरच केली जाईल. प्रेक्षकांसाठी ही एक वेगळी आणि विस्मरणीय सिनेमाई अनुभूती ठरेल, यात शंका नाही.