1854 मध्ये कुडाळमध्य़े टेंबे स्वामींचा जन्म झाला. दत्तात्रयांचा अंश असलेले टेंबे स्वामींमध्ये लहान वयातच कोणतीतरी दैवी शक्ती आहे हे घरच्यांनी ओळखलं होतं. ज्योतिष, वेद शास्त्र पुराण यामध्ये टेंबे स्वामी अत्यंत पारंगत होते. दत्तगुरुंच्या नामाचं वेड त्यांना लहानपणापासूनच होतंं. आज आपण जो दत्तात्रयांचा मंत्र ऐकतो ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा मंत्र टेंबे स्वामींनी लिहिला. असं म्हणतात की, टेंबे स्वामींचे वडिल गणेश भट यांना स्वप्नात दत्तगुरुंनी दृष्टांत दिला होता. गाणगापूरला जेव्हा टेंबे स्वामींचे वडिल गेले होते त्यावेळी त्यांना आपल्या पोटी पुत्ररत्न होणार असल्याची चाहूल लागली होती.
टेंबे स्वामी जसजसे मोठे होत गेले त्यांना जाणवायला लागलं की आपला जन्म हा दत्तगुरुंनी योजलेल्या कार्यासाठी झालेला आहे. स्वामींची दत्तगुरुंवर भक्ती इतकी होती की अनवाणी टेंबे स्वामींनी भारतभर भ्रमण केलं. गाणगापूर ते भारतभरातील दत्तगुरुंची जेवढी तीर्थस्थानं आहेत टेंबे स्वामींनी अनवाणी चाालत दर्शन घेतलं.
लहानपणापासून त्यांनी प्रत्येक खडतर परिक्षा पार केली. असं म्हटलं जातं की, टेंबे स्वामी अग्नीला स्पर्श करत नव्हते. त्यामुळे कितीही थंडी असो ते कायम थंड पाण्याने अंघोळ करत. विशेष म्हणजे टेेबे स्वामींनी कधीही शिजवलेलं अन्न ग्रहण केलं नाही ते कंदमुळं आणि फळं खाऊन उदरनिर्वाह करीत.दत्तांच्या सेवेत आजन्म वाहून घेतलेल्या टेंबे स्वामींनी लोककल्यणासाठीच कार्य केलं. टेंबे स्वामींच्या भक्ती आणि त्यागामुळेच दत्तसंप्रदायात त्यांचं स्थान मोठं आहे.






