मराठी सिनेसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ अशी ओळख निर्माण केलेल्या सिद्धार्थ चांदेकरने आपल्या सहजसुंदर आणि प्रामाणिक अभिनयाच्या जोरावर पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. केवळ आकर्षक व्यक्तिमत्त्वापुरता मर्यादित न राहता, सातत्याने स्वतःला नव्याने सादर करण्याची जिद्द आणि भूमिकांमधील प्रामाणिकपणा यामुळे सिद्धार्थ आज मराठीतील महत्त्वाचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. प्रत्येक नव्या भूमिकेत तो अधिक परिपक्व आणि विचारपूर्वक अभिनय करताना दिसतो, हेच त्याच्या कारकिर्दीचे मोठे वैशिष्ट्य आहे.
लग्नानंतर पहिल्यांदाच ‘चीकाटीलो’ चित्रपटात झळकणार शोभिता धुलिपाला; साकारणार अनोखी भूमिका
‘झिम्मा’ आणि ‘झिम्मा २’ या चित्रपटांतून सिद्धार्थने आधुनिक, संवेदनशील पुरुषाची भूमिका प्रभावीपणे साकारली. तर ‘फसक्लास दाभाडे’सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून त्याने स्वतःच्या अभिनयाची नवी बाजू प्रेक्षकांसमोर मांडली. या चित्रपटांमधील त्याच्या भूमिकांनी केवळ तरुण प्रेक्षकांनाच नाही, तर कुटुंबप्रेमी प्रेक्षकांनाही आपलेसे केले. सिद्धार्थच्या अभिनयात असलेली सहजता, संवादफेक आणि भावनांची सूक्ष्म हाताळणी यामुळे त्याच्या भूमिका खऱ्या अर्थाने जिवंत वाटतात.
अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘मिसेस देशपांडे’ या वेबसीरिजमध्ये साकारलेली सिद्धार्थची भूमिका विशेष चर्चेत राहिली. अतिशय संयमित आणि वास्तवाच्या जवळ जाणारा त्याचा अभिनय प्रेक्षकांनी उचलून धरला. कोणताही अतिरेक न करता, प्रसंगानुरूप भाव व्यक्त करण्याची त्याची शैली प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अनेकांनी सोशल मीडियावरही त्याच्या अभिनयाचे कौतुक करत, ही भूमिका त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या भूमिकांपैकी एक असल्याचे मत व्यक्त केले. नव्या वर्षात प्रदर्शित झालेला ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपटही सिद्धार्थसाठी खास ठरत आहे. या चित्रपटातील त्याची भूमिका भावनिक असून समाजाशी जोडलेली आहे. शिक्षण, संघर्ष आणि मूल्यांभोवती फिरणाऱ्या या कथेत सिद्धार्थने साकारलेली व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनाला भिडली आहे. ‘क्रांतिज्योती’मधील त्याचा अभिनय केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता विचार करायला लावणारा आहे, अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून मिळत आहे.
Star Pravah : TRP मुळे स्टार प्रवाहवर वाहिनीचा मोठा निर्णय; दोन महिन्यातच ‘या’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप
आजवर ‘रोमँटिक हिरो’ आणि ‘चॉकलेट बॉय’ ही प्रतिमा जपत असतानाच सिद्धार्थने त्या चौकटीबाहेर पडत विविध भूमिका स्वीकारल्या. वेगवेगळ्या शैलींच्या कथा, वेगळ्या मानसिकतेच्या व्यक्तिरेखा आणि आशयपूर्ण प्रोजेक्ट्सची निवड यामुळे तो प्रयोगशील अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. मागील वर्ष सिद्धार्थसाठी यशस्वी ठरले असून, नव्या वर्षाची सुरुवातही त्याच्यासाठी दमदार झाली आहे. आपल्या प्रवासाबद्दल बोलताना सिद्धार्थ चांदेकर म्हणतो, “एक कलाकार म्हणून स्वतःला सतत नव्याने शोधणं हेच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम आणि विश्वास मला नवनवीन प्रयोग करण्याची ताकद देतो. वेगवेगळ्या भूमिका करताना शिकायला मिळणारा अनुभवच माझा खरा ठेवा आहे.” येत्या काळात विविध प्रोजेक्ट्समधून सिद्धार्थ वेगवेगळ्या व्यक्तिरेखांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याचा अभिनयप्रवास अधिकच उत्सुकता निर्माण करणारा ठरत आहे.













