दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता नाग शौर्यच्या तब्बेतीबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नाग शौर्य त्याच्या आगामी एन एस 24 या चित्रपटाची शूटिंग करीत असताना सेटवरच बेशुद्ध पडला. शूटिंग दरम्यान अचानकपणे सेटवर त्याची प्रकृती बिघडली णि तो बेशुद्ध पडला. त्यानंतर नाग शौर्यला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले.
येणाऱ्या २० नोव्हेंबर रोजी नाग शौर्य लग्नबंधनात अडकणार आहे. मात्र त्याआधीच तब्बेत बिघडणे हे त्याच्या कुटुंबासाठी आणि चाहत्यांसाठी चिंतेची बाब बनली आहे. ‘NS 24’ या चित्रपटात नाग शौर्यचे बरेच ॲक्शन सीक्वेन्स आहेत. यासाठी त्याने विशेष प्रशिक्षणसुद्धा घेतलं आहे. ॲक्शन सीनदरम्यान परफेक्ट बॉडी दिसण्यासाठी तो ‘नो वॉटर डाएट’ म्हणजे द्रव्य पदार्थांचं सेवन करत नव्हता, अशीही माहिती समोर आली आहे. कदाचित त्यामुळेच नाग शौर्यची तब्बेत बिघडली असावी.
शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्याने सेटवर नाग शौर्य बेशुद्ध पडला. एशियन इन्स्टीट्यूट ऑफ गॅस्ट्रॉएंटरोलॉजी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. येत्या २० नोव्हेंबर रोजी त्याचं प्रेयसी अनुषा शेट्टीसोबत लग्न होणार आहे. सोशल मीडियावर त्याने लग्नपत्रिकेचा फोटोसुद्धा शेअर केला होता. या लग्नसोहळ्याला कुटुंबीय, मित्रपरिवार आणि फिल्म इंडस्ट्रीतील बरेच सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. लग्नापूर्वीचे कार्यक्रम बेंगळुरूतील जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेलमध्ये पारपडणार आहेत. १९ नोव्हेंबरला मेहंदीचा कार्यक्रम आणि २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११:२५ ला विवाहसोहळा संपन्न होणार आहे.