फोटो सौजन्य - Social Media
दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘असुरवन’ या आगामी मराठी चित्रपटाच्या मोशन पोस्टरने सोशल मीडियावर प्रचंड चर्चा निर्माण केली आहे. स्वप्नस्वरूप प्रस्तुत आणि सचिन आंबात लिखित-दिग्दर्शित या चित्रपटाच्या पोस्टरला तब्बल १ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. पोस्टर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. वाघाच्या चित्राने रंगवलेला मुखवटा, रहस्यमय जंगल आणि आदिवासी संस्कृतीचं आकर्षक दर्शन यामुळे हा चित्रपट काहीतरी वेगळं दाखवणार असल्याची झलक मिळते. पार्श्वसंगीतातील गूढ स्वर आणि दृश्यांतील रहस्यात्मकता या सगळ्यामुळे ‘असुरवन’ चं कथानक नेमकं कशावर आधारित आहे, याबद्दल सगळ्यांनाच कुतूहल वाटतं आहे.
दिग्दर्शक सचिन आंबात यांनी त्यांच्या पहिल्याच चित्रपटाच्या मोशन पोस्टरविषयी सांगितलं, “हा माझा पहिला चित्रपट आहे आणि त्याचं मोशन पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित केलं आहे. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद अप्रतिम आहे. या पोस्टरमध्ये दिसणारं जंगल हे श्रापित जंगल आहे आणि तेच ‘असुरवन’ म्हणून ओळखलं जातं. या जंगलाच्या मध्यभागी मुखवटा घातलेलं पात्र दिसतं, ज्याला आदिवासी वारली भाषेत ‘देवाचा सोंग’ असं म्हटलं जातं.”
ते पुढे सांगतात, “हा मुखवटा ‘फिरसत्या देवाचा’ आहे. या देवाची एक अनोखी कथा आहे — जो जंगलात हरवलेल्या चांगल्या मनाच्या लोकांना रस्ता दाखवतो, पण जे वाईट मनाने जंगलात येतात त्यांना चकवा देऊन कायमचं त्या जंगलात अडकवतो. हा ‘फिरसत्या देव’ खरोखर मार्गदर्शक ठरतो की भुलवणारा, हे तुम्हाला ‘असुरवन’ चित्रपटात पाहायला मिळेल.”
हा चित्रपट केवळ रहस्यमय कथा सांगणारा नसून, तो महाराष्ट्रातील आदिवासी वारली संस्कृतीचा सखोल परिचय देणारा ठरणार आहे. श्रद्धा, लोककथा, आणि जंगलातील गूढ परंपरा यांचं सुंदर मिश्रण यात पाहायला मिळेल. आदिवासी जीवनातील श्रद्धा, भीती आणि देवत्वाचा संगम या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकाने प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्या ‘असुरवन’ चं मोशन पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत असून मराठी चित्रपटसृष्टीत नवी उत्सुकता निर्माण करत आहे. रहस्य, रोमांच आणि आदिवासी परंपरेचं दर्शन देणारा हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव देणार असल्याचं निश्चित आहे.