फोटो सौजन्य - Social Media
मुंबईची 12 वर्षांची वंशी मुदलियार हिने जगासमोर भारतीय संगीताची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. टोकियोमध्ये झालेल्या गोल्डन क्लासिकल म्युझिक अवॉर्ड्स 2025 मध्ये तिने गोल्ड फर्स्ट प्राईज पटकावत मोठा इतिहास घडवला. 20 ऑगस्ट रोजी आशियातील प्रतिष्ठित टोकियो ओपेरा सिटी कॉन्सर्ट हॉल येथे झालेल्या लाईव्ह सादरीकरणात तिच्या मोहक आवाजाने परीक्षक आणि प्रेक्षकांची मने जिंकली.
हे यश वंशीसाठी विशेष ठरतं कारण गेल्या वर्षीच तिने व्हिएन्ना इंटरनॅशनल आर्ट्स फेस्टिव्हल 2024 मध्ये सिल्व्हर मेडल मिळवले होते. त्यामुळे सलग दोन आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार जिंकणारी ती सर्वात कमी वयाची भारतीय कलाकार ठरली आहे. युरोप आणि आशिया या दोन्ही खंडांमध्ये एकाचवेळी दमदार छाप पाडणं हे 12 वर्षांच्या मुलीसाठी अप्रतिम यश मानलं जातं.
या स्पर्धेत जगभरातील अनेक प्रतिभावान कलाकारांनी सहभाग घेतला होता. सुरुवातीला ऑनलाईन व्हिडिओ ऑडिशन झाले, त्यातून निवड झालेल्या कलाकारांना 18 ते 20 ऑगस्टदरम्यान टोकियोमध्ये थेट सादरीकरणाची संधी मिळाली. अंतिम दिवशी वंशीने आपल्या अद्वितीय गायनकौशल्याने परीक्षकांची मने जिंकली आणि सुवर्णपदक पटकावलं.
वंशीच्या या प्रवासामागे पाच वर्षांचं कठोर प्रशिक्षण आहे. तिने पुण्यातील राहेल म्युझिक अकॅडमीमध्ये राहेल शेकटकर यांच्याकडे पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं आहे. मुंबई-पुणे अंतर असूनही गुरु-शिष्य नात्याने निर्माण केलेली जिद्द आणि सातत्य यामुळे वंशीने दोन मोठी आंतरराष्ट्रीय पदके जिंकून भारताचं नाव उज्ज्वल केलं आहे. राहेल म्युझिक अकॅडमी आता पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी एक महत्त्वाचं केंद्र ठरत आहे, आणि वंशीचं यश हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.
फक्त 12 वर्षांच्या वयात पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतामध्ये प्रभुत्व मिळवणं हे सोपं काम नाही. या प्रकारच्या संगीतासाठी सातत्यपूर्ण मेहनत, आवाजावर नियंत्रण, भावनिक अभिव्यक्ती आणि धैर्य आवश्यक असतं. वंशीने दाखवून दिलं आहे की योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास भारतीय मुले जागतिक पातळीवर चमकू शकतात.
मुंबई ते व्हिएन्ना आणि आता टोकियो हा प्रवास फक्त एका कलाकाराचा नाही, तर भारताच्या नव्या पिढीच्या क्षमतेचं द्योतक आहे. वंशीने सिद्ध केलं की संगीत ही खऱ्या अर्थाने सीमांच्या पलीकडची भाषा आहे जी जगाला एकत्र आणते. दोन आंतरराष्ट्रीय सन्मानांनी तिने भारताचा मान उंचावला आहे आणि आज ती जागतिक स्तरावर भारतीय संगीतकलेचं नवं प्रतीक बनली आहे.