सौजन्य- सोशल मीडिया
मराठी सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध खलनायिका सुहासिनी देशपांडे काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या अढळ स्थान निर्माण करणाऱ्या सुहासिनी यांचं निधन पुण्यातील राहत्या घरी झालं आहे.
हे देखील वाचा – प्रसिद्ध हॉलिवूड गायिकेवर कोसळला दु:खाचा डोंगर, एकाच दिवशी आईचे आणि बहिणीचे निधन
त्यांच्या पार्थिवावर उद्या (२८ ऑगस्ट) पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुहासिनी देशपांडे ह्या मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी आपल्या ७० वर्षांच्या सिनेकरियरमध्ये १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सुहासिनी यांनी वयाच्या १२ व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केलं होतं.
सुहासिनी यांनी ‘चिरंजीव’, ‘वारसा लक्ष्मीचा’, ‘आई शप्पथ’, ‘मंडळी तुमच्यासाठी कायपण’, ‘आम्ही दोघे राजा राणी’, ‘माहेरचा आहेर’, ‘धोंडी’ अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. २०११ साली रिलीज झालेल्या अजय देवगणच्या ‘सिंघम’ चित्रपटातही सुहासिनी यांनी काम केलं होतं. चित्रपटात त्यांनी काजल अग्रवालच्या (काव्या)च्या आजीची भूमिका साकारली होती.
हे देखील वाचा – दिशाचा खोटा चेहरा की प्रीतमचं खरं प्रेम…; कोण जिंकेल प्रेमाची लढाई?
शिवाय, सुहासिनी यांचं मराठी रंगभूमीशी देखील अतूट नातं होतं. मराठी रंगभूमीवर त्यांनी अनेक लोकप्रिय नाटकांमधून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. ‘तुझं आहे तुझ्या पाशी’, ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘बेल भंडार’, ‘सुनबाई घर तुझंच आहे’, ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘चिरंजीव आईस’, ‘सासूबाईंचं असंच असतं’ व ‘लग्नाची बेडी’ अशा नाटकांचे हजारो प्रयोग त्यांनी केले आहेत. रंगभूमीवरील कामगिरीबद्दल सुहासिनी यांना २०१५ साली अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेतर्फे जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दरम्यान, सुहासिनी देशपांडे यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली सोशल मीडियावर त्यांचे चाहते श्रद्धांजली वाहत आहेत.