फोटो सौजन्य: करणवीर मेहरा इन्स्टाग्राम
‘बिग बॉस १८’चा ग्रँड फिनाले होऊन महिना उलटला असला तरीही शोच्या विजेत्याला अद्याप त्याच्या बक्षीसाची रक्कम मिळालेली नाही, असा खुलासा स्वत: ‘बिग बॉस १८’चा विजेता दस्तुर खुद्द अभिनेता करणवीर मेहराने केला आहे. १९ जानेवारी २०२५ ला ‘बिग बॉस १८’चा ग्रँड फिनाले पार पडला. या ग्रँड फिनालेमध्ये, करणवीरच्या नावावर ट्रॉफी आणि ५० लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. पण अद्यापही करणवीरला त्याचे पैसे मिळालेले नाहीत. असा खुलासा करणवीरने कॉमेडियन भारती सिंगच्या पॉडकास्टमध्ये केला आहे.
रस्ते अपघातात प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्याचे निधन, अनेक मालिकांमध्ये साकारलीये मुख्य भूमिका
‘बिग बॉस १८’च्या आधी करणवीरने ‘खतरों के खिलाडी १४’चं विजेतेपद पटकावलं होतं. तो शो जिंकल्यानंतर बक्षिसाची रक्कम मिळाल्याचंही त्याने सांगितलं. दरम्यान, दोन्ही शोच्याही बक्षिसाच्या रक्कमेबद्दल आणि गिफ्ट्सबद्दल करणवीरने सांगितले की, “माझा कलर्स टिव्हीसोबत ‘खतरों के खिलाडी १४’ हा पहिलाच शो होता. पण मला या चॅनलला सोडण्याचे कोणतेही कारण नाही. या चॅनलमुळे मला एक प्रसिद्धी मिळाली आहे. ‘बिग बॉस १८’शोमध्ये विजेतेपद जिंकल्यानंतर मला ५० लाख रुपये बक्षीस मिळणार होते, पण ते मला अद्यापही मिळालेले नाहीत. परंतु ‘खतरों के खिलाडी १४’चे पैसे मला मिळाले आहेत. त्याचप्रमाणे शोमध्ये मी जी कार जिंकली होती, ती काही दिवसांतच मला मिळणार आहे. मला याआधी वेळ मिळाला नव्हता, त्यामुळे मी आता बुक केली.”
यानंतर भारतीने करणवीरला ‘बिग बॉस १८’चा विजय हा स्क्रिप्टेड होता का ? असा प्रश्न विचारल्यावर करणवीरने उत्तर दिले की, “ही सर्व देवाची प्लॅनिंग होती. प्रत्येकाने माझ्या विजयात काही ना काही योगदान दिलंय. मला बिग बॉसच्या घरात मजा येत होती, खरंतर मी केव्हाच शो जिंकण्याबद्दल विचारच करत नव्हतो. आठवड्याला मला किती मानधन मिळणार हे ठरलेलं होतं. त्यामुळे जिंकणं किंवा हरणं याने मला काही फरक पडत नव्हता. तो व्यक्तिमत्त्वाचा खेळ होता आणि माझं व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांना आवडलं. जरी मी दुसऱ्या स्थानी राहिलो असतो तरी मी काही वेगळा वागलो नसतो. पण मी जिंकेन असं मला वाटत होतं. बिग बॉस संपल्यानंतर मला जे प्रेम मिळतंय, ते भारावणारं आहे. मी चाहत्यांसोबत खूप वेळ घालवतोय. मला चाहत्यांकडून मोठ्याप्रमाणावर आशिर्वाद मिळतोय.”अशा शब्दांत करणवीरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.