दक्षिण भारताची खाद्य संस्कृती जशी जगभरात प्रसिद्ध आहे, तशीच ओळख दक्षिण भारतीय स्लिक साड्यांची सुद्धा आहे. दक्षिण भारतीय स्लिक साड्या सर्वच महिलांना त्यांच्या उठावदारपणामुळे भुरळ पडतात. सणावाराच्या दिवसांमध्ये किंवा लग्न समारंभात ट्रेडीशन लुक करण्यासाठी स्लिक साड्या नेसल्या जातात. स्लिक साड्या अंगावर अतिशय चापून चोपून बसतात. या साड्यांची खासियत म्हणजे साडीवर केलेले बारीक नक्षीकाम आणि रेश्माच्या धाग्यांचा वापर. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दक्षिण भारतीय कोणत्या साड्या जगभरात प्रसिद्ध आहेत? या साड्यांची नेमकी खासियत काय? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
लग्न समारंभात नेसा दक्षिण भारताची ओळख असलेल्या भरजरी साड्या

सर्वच महिलांना कांजीवरम सिल्क साडी नेसायला खूप जास्त आवडते. ही साडी खास तामिळनाडूमध्ये तयार केली जाते. गर्भरेशमी काठ आणि अतिशय तलम पोत असणारी साडी दक्षिण भारताच्या काही भागांमध्ये ब्राईडल सिल्क साडी म्हणून सुद्धा ओळखली जाते. हल्ली सर्वच मुली लग्नाच्या रिसेप्शन लुकसाठी कांजीवरम साडीची निवड करतात.

आंध्रप्रदेशची ओळख असलेली धर्मावरम सिल्क साडी जगभरात फेमस आहे. ही साडी अनंतपूर जिल्ह्यातल्या धर्मावरम शहरात विणली जाते. विणकामाच्या विशिष्ट पद्धतीसाठी, विविध रंग आणि साडीवरील उत्कृष्ट विणकामासाठी धर्मावरम सिल्क साडी प्रसिद्ध आहे. धर्मावरम सिल्क साडीचा काठ आकर्षक रंगाचा असतो. प्युअर धर्मावरम सिल्क साडीचे विणकाम दोन वेगवेगळ्या रांगांमध्ये केले जाते. यामुळे साडीवर चमकदार शाईन येते.

आंध्र प्रदेशात तयार करण्यात आलेली उप्पाडा सिल्क साडी भारतभर प्रसिद्ध आहे. ही साडी वेगवेगळ्या रंगांमध्ये बनवली जाते. साडी विणण्यासाठी सोन्याच्या रंगातील जरीचा वापर केला जातो. सिल्क किंवा कॉटन सिल्क अशा दोन्ही फ्रॅब्रिकमध्ये उप्पाडा साडी उपलब्ध आहे. पूर्वीच्या काळी लग्न समारंभात महिला उप्पाडा साडी नेसायच्या.

कर्नाटकाची ओळख असलेली म्हैसूर सिल्क साडी सर्वच महिलांना खूप जास्त आवडते. कारण या साडीच्या काठावर आणि साडीच्या आतील भागात सोनेरी रंगाच्या जरीचा वापर करून बारीक बारीक नक्षीकाम केले जाते. या साडीचा काठ अतिशय लहान असतो. तसेच साडीची शुद्धता ओळखण्यासाठी काही थेंब पाणी टाकावे. साडीने पाणी शोषले नाही, तर ती प्युअर म्हैसूर सिल्क साडी, असे मानले जाते.

भारतातील तेलंगणामध्ये जोगुलांबा गढवाल या भागात गढवाल सिल्क साडी विणली जाते. गढवाल सिल्क साडीला २०० हुन अधिक वर्षांचा इतिहास लाभला आहे. राणी आधीलक्ष्मी देवम्मा यांनी वेगवेगळ्या राज्यातून आणलेल्या कारागिरांच्या कलेला प्रोत्सान दिले आणि त्यानंतर त्यांनी हस्तकला वाढवली. गढवाल सिल्क साडी अनेक वेगवेगळ्या रांगांमध्ये उपलब्ध आहे.






