थंडीसह इतर सर्वच ऋतूंमध्ये बाजारात हिरव्या पालेभाज्या उपलब्ध असतात. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. सतत बाहेरील जंक फूड आणि तिखट तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. वारंवार पचनाच्या समस्या उद्भवतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये असलेले घटक औषधांपेक्षा ही खूप जास्त प्रभावी आहेत. त्यामुळे रोजच्या आहारात या पालेभाज्यांचे नियमित सेवन करावे. (फोटो सौजन्य – istock)
पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या 'या' हिरव्या पालेभाज्यांचा रोजच्या आहारात करा समावेश

कडवट चवीची मेथी भाजी शरीरासाठी वरदान आहे. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मेथीच्या भाजीचे सेवन करावे. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी मेथीची भाजी सुपरफूड मानली जाते. कारण यामध्ये असलेले अमीनो आम्ल इन्सुलिन स्राव वाढविण्यास मदत करते.

शरीरात निर्माण झालेली हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी लाल रंगाच्या पालेभाजीचे सेवन करावे. लालमाठ खाल्ल्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते. यामुळे थकवा आणि अशक्तपणा कमी होतो.

चेहऱ्यावर आलेल्या सुकूत्या, पांढरे केस आणि इतर समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कढीपत्ता खावा. सकाळी उठल्यानंतर कढीपत्त्याची दोन ते तीन पाने चावून खाल्ल्यास वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात.

बिघडलेली पचनक्रिया, गॅस, बद्धकोष्ठता इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी पुदिन्याच्या पानांचे सेवन करा. पुदिन्याच्या पानांमध्ये असलेले मेन्थॉल पाचक एंजाइम सक्रिय करतात आणि ऍसिडिटी कमी करतात.

कमकुवत हाडे आणि सांध्यांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी शेपूच्या भाजीचे सेवन करावे. शेपूच्या भाजीमुळे शरीराला पुरेसे कॅल्शियम आणि फॉस्फरस मिळते.






