महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरात पैठणी साडी प्रसिद्ध आहे. सर्वच महिलांना पैठणी साडी नेसायला खूप जास्त आवडते. सणावाराच्या दिवसांमध्ये किंवा लग्नसराईत सगळ्यात पहिली पसंती पैठणी साडीला दिली जाते. पदरावर जरतारीचा मोर, बारीक नक्षीकाम आणि सोनं चांदीची जर वापरून तयार केलेली साडी महाराष्ट्राचे विशेष आकर्षण आहे. हल्ली लग्न समारंभात नववधू सुद्धा पैठणी साडी नेसतात. शाही साड्यांच्या यादीमध्ये पैठणी साडीचे नाव आहे. कारण प्रत्येक मराठी स्त्रीच्या साड्यांच्या खजिन्यात पैठणी साडी ही आहेच. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचे महावस्त्र असलेल्या पैठणी साडीचा इतिहास आणि वैशिट्य सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
महाराष्ट्राचे महावस्त्र पैठणी साडी!
पैठणी साडीला २०० वर्षांपूर्वीचा इतिहास लाभला आहे. सातवाहन राजवंशाच्या काळात पैठणीच्या निर्मितीला सुरूवात झाली होती. पारंपारिक भरजरी सिल्क साडीचा शोध गोदावरीच्या तीरावरील औरंगाबादमधल्या पैठण शहरात लागला. म्हणून या साडीला पैठणी साडी असे नाव देण्यात आले.
हातमागावर विणण्यात आलेल्या पैठणीवर प्राचीन शैलीचे नक्षीकाम केले जात होते. पूर्वीच्या काळी पैठणी साडी फक्त मोरपंखी रंगात मिळत होती. या साडीच्या पदरावर सोन्याच्या धाग्यांचे विणकाम केले जाते. याशिवाय पैठणी साडी विणायला तब्बल 18 ते 24 महिने एवढा काळ लागत असे. त्यामुळे पूर्वीच्या काळातील राजघराण्यांमधील शाही विवाह सोहळ्यांमध्ये पैठणी साडीला पसंती होती.
पैठणीच्या पदरावरील जरीकामात खऱ्या सोन्याचे आणि चांदीचे धागे वापरून विणकाम केले जाते. पैठणी साडी विणण्यासाठी बंगळूरचे मलबेरी सिल्क किंवा सुरतहून आलेली जर वापरली जाते. एक सहावारी पैठणी साडी तयार करण्यासाठी तब्बल 500 ग्रॅम सिल्क धागे आणि 250 ग्रॅम जर लागते.
पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत पैठणी साडी सहावारी आणि नऊवारी अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. पैठणी साडीची खरी वैशिष्ट्य म्हणजे ही साडी दोन्ही बाजूने सारखीच असते. खऱ्या ताग्यावर विणलेल्या पैठणीची ही ओळख आहे. याशिवाय खऱ्या जरीचा वापर करून विणलेली पैठणी कधीच काळी पडत नाही.
पारंपरिक पैठणी साडी डाय केलेल्या धाग्यांपासून विणली जाते. लाल, पिवळा, निळा, मजंटा, हिरवा, गुलाबी आणि जांभळा अशा अनेक रंगांमध्ये पैठणी साडी विणली जाते. पैठणीवरील प्रसिद्ध नक्षीकामात मोर, बांगडी मोर, पोपट मैना, अजंता कमळ, आसवली इत्यादी आकर्षक नक्षीकाम केले जाते.