धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, कमी पाण्याचे सेवन, पोषक घटकांचा अभाव इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर शरीरात अनेक बदल जाणवू लागतात. या बदलांकडे दुर्लक्ष केल्यास शरीराला हानी पोहचते. शरीरात कॅल्शियम, ऑक्सलेट किंवा युरिक ऍसिड जास्त प्रमाणात जमा झाल्यामुळे किडनी स्टोन होतो. किडनी स्टोन झाल्यानंतर पोटात असह्य वेदना होतात तर काहीवेळा लघवी करताना जळजळ होणे इत्यादी गंभीर लक्षणे दिसून येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला किडनी स्टोन झाल्यानंतर कोणत्या पदार्थांचे सेवन केल्यास पोटात वेदना वाढू शकतात, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)
किडनी स्टोन असलेल्या व्यक्तींनी चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ! पोटात वाढतील असह्य वेदना

पालक, बीट, रताळी इत्यादी पदार्थांमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते. हे पदार्थ कॅल्शियमशी जोडलेले असतात, ज्यामुळे किडनीमध्ये स्टोन वाढतो. त्यामुळे पालेभाज्यांचे सेवन बेताने करावे.

जास्त मीठ शरीरातील कॅल्शियम शोषण वाढून किडनीमध्ये स्टोन तयार करते. प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये स्नॅक्स, खारट स्नॅक्स इत्यादी पदार्थांचे कमीत कमी प्रमाणात सेवन करावे.

लाल मांस आणि इतर उच्च-प्रथिने असलेले मांसाहारी पदार्थ युरिक ऍसिडची पातळी वाढवतात. या पदार्थांचे सेवन करणे शरीरासाठी धोक्याचे आहे. त्यामुळे लाल मांस अजिबात खाऊ नये.

जास्त चहा, कॉफी आणि एनर्जी ड्रिंक्सचे सेवन केल्याने डिहायड्रेशन वाढते आणि शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. शरीरात पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासाठी भरपूर पाणी आणि नारळपाणी, विटामिन सी युक्त पेय प्यावे.

फास्ट फूडमध्ये मीठ आणि ट्रान्स फॅट्सचे प्रमाण जास्त असते, ज्याचा थेट परिणाम किडनीवर दिसून येतो. त्यामुळे कायमच बंद पाकिटमधील पदार्थांचे सेवन करू नये.






