प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी छाप निर्माण करणारा गायक आणि परफॉर्मर श्रीराम चंद्रा आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर सूत्रसंचालक म्हणून झळकणार आहे. दोन यशस्वी सिझननंतर तो पुन्हा मायक्रोफोन हातात घेऊन लोकप्रिय सिंगिंग रिअॅलिटी शो तेलुगु इंडियन आयडलच्या चौथ्या सिझनमध्ये सूत्रसंचालन करणार आहे. त्याची बुद्धिमत्ता, करिष्मा आणि प्रेक्षकांशी असलेली जवळीक यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
श्रीराम चंद्रा तेलुगू इंडियन आयडल शोचे सूत्रसंचालन करतील. (फोटो सौजन्य - Social Media)
आपल्या या नव्या प्रवासाबद्दल बोलताना श्रीराम भावूक होत म्हणतो, “मी स्वतः याच मंचावर उभा राहून माझं स्वप्न पूर्ण केलं आहे.
त्यामुळे आता ज्या नव्या स्पर्धकांनी स्वप्नं डोळ्यात घेतली आहेत, त्यांच्या भावना, त्यांचं टेन्शन आणि त्यांचा संघर्ष मला पूर्णपणे समजू शकतो. सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून मला प्रेक्षकांशी वेगळ्या पद्धतीने जोडता येतं आणि हा अनुभव माझ्यासाठी खास आहे.”
या सिझनच्या स्पर्धकांविषयी तो म्हणतो, “यावेळी काही अप्रतिम प्रतिभावान गायक मंचावर उतरतील. प्रत्येकाचा आवाज, शैली आणि वैशिष्ट्य वेगळं आहे.
त्यांच्या गायनाची जादू प्रेक्षकांना भारावून टाकेल, आणि त्यांना स्टेजवर परफॉर्म करताना पाहण्यासाठी मी स्वतःही आतुर आहे.”
तेलुगु इंडियन आयडल 4 चे प्रसारण 29 ऑगस्टपासून सुरू होणार असून, या नव्या पर्वात संगीतप्रेमींना एक अप्रतिम आणि भावनिक प्रवास अनुभवायला मिळणार आहे.