आशिया कप वि दक्षिण कोरिया(फोटो-सोशल मीडिया)
Hockey Asia Cup 2025 : भारतात सध्या बिहारमध्ये हॉकी आशिया कपचा थरार सुरू आहे. २९ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत धक्कादायक निकाल लागला आहे. गतविजेत्या दक्षिण कोरियाला मलेशियाने मोठा धक्का दिला आहे. दक्षिण कोरियाची या स्पर्धेत पराभवाने सुरुवात झाली आहे. शनिवारी मलेशियाकडून दक्षिण कोरियाचा ४-१ ने पराभव करण्यात आला. त्याच वेळी, बांगलादेशने देखील चायनीज तैपेईला हरवून पहिला विजय नोंदवला आहे.
हेही वाचा : Ashes series पूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय! न्यूझीलंड दौऱ्यासाठी Pat Cummins ला विश्रांती देणार
दिवसाच्या पहिल्या सामन्यात बांगलादेश संघाने आपला दबदबा कायम ठेवला. बांगलादेश संघाने शेवटच्या दोन क्वार्टरमध्ये पाच गोलची कमाई केली. बांगलादेशकडून मोहम्मद अब्दुल्ला (४थे आणि २६वे मिनिट), रकीबुल हसन (४२वे आणि ४३वे मिनिट) आणि अशरफुल इस्लाम (४५वे आणि ५८वे मिनिट) यांनी प्रत्येकी दोन गोल केले तर सोहानूर सोबुज (३६वे मिनिट) आणि रेझाउल बाबू (५६वे मिनिट) यांनीही गोल केले. तर चायनीज तैपेईकडून त्सुंग-यू ह्सीह (१०वे आणि १८वे मिनिट) यांनी दोन गोल केले तर त्सुंग-जेन शिह (६०वे मिनिट) यांनी अंतिम हॉटरपूर्वी पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. अशा प्रकारे बांगलादेशने चायनीज तैपेईचा ८-३ असा पराभव केला. बांगलादेश आता सामना १ सप्टेंबर रोजी कोरियाशी भिडणार आहे. तर चायनीज तैपेईचा सामना त्याच दिवशी मलेशियाशी दोन हात करेल.
दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात, पाच वेळा विजेत्या कोरियाला परभवाचा सामाना करावा लागला. कोरियाने दुसऱ्या मिनिटाला जिओनह्यो जिनच्या मैदानी गोलने आघाडी मिळवली. त्यानंतर कोरियाचा आत्मविश्वास वाढला परंतु अखिमुल्लाह अन्वरने हॅटट्रिक केल्याने मलेशियाने कोरियाच्या गतीला चांगलाच ब्रेक लावला. अन्वर व्यतिरिक्त, अशरन हमसानीनेही एक गोल केला. अखिमुल्लाह अन्वरकडून २९ व्या, ३४ व्या आणि ५८ व्या मिनिटाला गोल करण्यात आले. मलेशियाकडून दक्षिण कोरियाचा ४-१ ने पराभव स्वीकारावा लागला.
या पराभवामुळे कोरियाच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. जागतिक क्रमवारीत मलेशिया १२ व्या स्थानावर विराजमान आहे. तर कोरियाचा संघ १३ व्या स्थानावर आहे. तथापि, यानंतरही या सामन्यात कोरियाला प्रबळ दावेदार मानण्यात आले होते.