उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आव्हान! बारामतीचा चेहरामोहरा बदलणार
प्रचाराच्या सांगता सभेत उमेदवार-कार्यकर्ते उपस्थित
बारामती नगर परिषद निवडणुकीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराच्या सांगता सभेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी पृथ्वीराज जाचक, विश्वासराव देवकाते, संभाजी होळकर, योगेश जगताप, संदीप बांदल, जय पाटील, अविनाश बांदल, अनिता गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव यांच्यासह राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी व उमेदवार तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार?
यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, आपण आपल्या राजकीय जीवनामध्ये शिव, फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांची विचारधारा कधीही सोडली नाही. त्यांच्या विचारधारेनुसार प्रत्येक जाती-धर्माला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. जातीपातीचे राजकारण आपण कधीही केलेले नाही. बारामतीतील प्रत्येक समाज घटकाला आपण नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडणुकीमध्ये एखाद्या समाज घटकाला सचिन मिळाले नसले, तरी या निवडणुकीनंतर स्वीकृत साठी अथवा इतर ठिकाणी त्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला जाईल.
विकासकामांचा धडाका
बारामती शहराची लोकसंख्या या दहा वर्षात सात पट वाढली आहे, या पार्श्वभूमीवर आपण विविध ठिकाणी मोठे रस्ते निर्माण केले आहेत. पुण्यानंतर बारामती शैक्षणिक हब म्हणून ओळखले जात आहे. राज्यातील अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी देखील अशा सुविधा नसतील, अशा सुविधा आपण बारामतीमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. तरी देखील झोपडपट्टी भागातील काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करू. डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहतीप्रमाणे इतर ठिकाणी देखील गृह प्रकल्प उभारण्याचा आपला प्रयत्न आहे.
अजित पवारच निवडणूक लढवत असल्याचे समजा!
विरोधकांनी केलेल्या टीकेला मी कामातून उत्तर देण्याचा प्रयत्न असतो, महायुतीचे सरकार अजून राज्यात ४ वर्षे आहे, त्यामुळे सत्तेच्या माध्यमातून आपण सर्वाधिक विकास करून दाखवू, बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार निवडणुकीत उभा आहे, हे समजून खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
तिसऱ्या पिढीला संधी: सचिन सातव यांचे भावूक आवाहन
प्रास्ताविक सचिन सातव यांनी अजित दादांवर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी असली तरी, त्यांनी कायम बारामतीकडे बारीक लक्ष ठेवून शहराची काळजी घेतली आहे. विविध विकासकामांच्या माध्यमातून बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम त्यांनी केले आहे. पाटील साडेपाच पासून दुपारी तीन वाजेपर्यंत ते अखंडपणे बारामतीसाठी काम करताना आपण पाहिले आहे, बारामतीकरांनी देखील अजितदादांवर प्रचंड प्रेम केले आहे. आपणास अजितदादांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची संधी दिली, हे ऋण मी कधीही विसरणार नाही. माझे आजोबा, वडील व आई यांनी नगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून बारामतीची सेवा केली आहे, आमच्या कुटुंबातील आता माझ्या माध्यमातन तिसऱ्या पिढीला ही संधी मिळणार आहे, बारामतीकरांनी माझ्यासह सर्व उमेदवारांना विजय करावे असे आवाहन सातव यांनी यावेळी केले.






