वणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या आतापासून हालचाली; भावी उमेदवारांनी बांधले गुडघ्याला बाशिंग
वणी : दिंडोरी तालुक्यातील वणी हे सर्वात मोठी व आर्थिकदृष्ट्या कोट्यवधी रुपयांचे अंदाजपत्रक असलेल्या ग्रामपालिकेची निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपल्याच्या चर्चेमुळे इच्छुकांनी आत्तापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे दिसत आहे. ही राजकीय पर्वणी साधण्यासाठी अनेक इच्छुक आतापासूनच कामाला लागल्याची वंदता आहे. सुमारे एक कोटी रुपयांपेक्षा अधिक अंदाजपत्रक असलेल्या वणी ग्रामपालिकेच्या निवडणुकीला अवघा वर्षभराचा कालावधी शिल्लक असल्याने ग्रामपालिकेत प्रतिनिधित्व करण्याची स्वप्ने इच्छुकांना पडू लागली आहेत.
अनेक वर्षांपासून प्रतिनिधित्व करणारे काहीजण काहीसे निश्चिंत दिसत असले, तरी त्यांच्या मनातील राजकीय खेळीचे वादळ चेहऱ्यावर दिसणार नाही, असा परिपक्वपणा त्यांनी अंगी बाणवला असला तरी, ‘ये पब्लिक है, ये सब जानती है’ याची कल्पना त्यांनाही आहे. राजकारणात प्रवेश करण्यासाठी ग्रामपंचायत अथवा ग्रामपालिका ही पहिली पायरी मानली जाते. ती पार केल्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि पुढील राजकीय प्रवासाची तीव्र इच्छा निर्माण होते. त्यासाठी साम, दाम, दंड, भेदासह मायक्रो प्लॅनिंग सुरू होते.
कार्यक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचे मृगजळ दाखवण्याची परंपरा जुनीच; मात्र आशावादी किती दिवस राहायचे, हा प्रश्न मतदारांना पडत असेल तर त्यात गैर ते काय? सध्या बॅनरबाजी, सार्वजनिक कार्यक्रमांतील उपस्थिती, संपर्क वाढवणे आणि कार्यक्रमांना रसद पुरविण्याची स्पर्धात्मक चढाओढ ही आगामी राजकारणाची नांदी मानली जात आहे. सत्ता, पद, प्रतिष्ठा आणि प्रभाव यांचा वापर विकासासाठी झाला तर सकारात्मक; अन्यथा त्रास देण्यासाठी झाला तर त्याचे परिणामही मतदार वेळ आल्यावर दाखवतात.
राजकीय गणिते सुरू
दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे अंदाज बांधत गावात कोण आणि जिल्हा परिषदेत कोण, याचे राजकीय गणित आतापासूनच सुरू झाले आहे. ठेकेदारी व्यवसायावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकीय कवच-कुंडलाचा वापर होत असल्याची चर्चाही आहे. राजकारण आणि ठेकेदारीचे संबंध सर्वश्रुत असले तरी या समीकरणामुळे अनेकांच्या संबंधात मिठाचा खडा पडल्याचेही बोलले जाते.
इच्छुक राजकीय मैदानात उतरण्यास सज्ज
नव्या दमाचे इच्छुक राजकीय मैदानात उतरण्यास सज्ज झाले असून, वाढती इच्छुकांची संख्या, आर्थिक ताकद आणि बदलती राजकीय समीकरणे यामुळे आगामी काळात भल्या-भल्यांची डोकेदुखी वाढणार, यात शंका नाही. शेवटी पद असताना आपण कोण आणि पद नसताना आपल्यासोबत कोण, याचा अनुभवच राजकीय प्रवासाची खरी परीक्षा ठरतो. कर्मा केम्स बैंक असे उगाच म्हटले जात नाही.






