फोटो सौजन्य - Social Media
दीपक गायकवाड – मोखाडा : महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या वचनांवर बहिणींच्या आशा पल्लवित होत्या, परंतु 24 डिसेंबर रोजी लाडकी बहीण योजनेतून मिळालेली सन्मान निधीची रक्कम फक्त 1500 रुपये खात्यात जमा झाल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने जाहीर सभांमधून सन्मान निधी 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. हे वचन महायुतीसाठी “गेमचेंजर” ठरले होते आणि अनेक बहिणींनी या योजनेवर विश्वास ठेवला होता. मात्र, सत्तेत आल्यानंतर आश्वासन पूर्ण होण्याऐवजी बहिणींना पुन्हा फक्त 1500 रुपयांवर समाधान मानावे लागले. 24 डिसेंबरला सन्मान निधीचे पैसे खात्यात जमा होताच बहिणींच्या चेहऱ्यावर आनंदापेक्षा नाराजीचा सूर दिसून आला. यामुळे योजनेबाबत सरकारविषयी नाराजी आणि प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
लाडकी बहीण योजनेबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगल्या होत्या. दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणात प्रत्येक बहिणीला 3000 रुपये सन्मान निधी आणि 2500 रुपये बोनस असे एकूण 5500 रुपये मिळतील, असे मेसेजेस सातत्याने फिरत होते. या घोषणांमुळे अनेक बहिणींच्या आशा उंचावल्या होत्या. दिवाळीच्या खर्चासाठी, मुलांच्या शाळेच्या फी भरायला किंवा इतर गरजा पूर्ण करण्यासाठी या निधीचा मोठा आधार होईल, असे त्यांना वाटले. मात्र, त्यावेळीही सरकारने फक्त 1500 रुपये जमा करून आशा फेल ठरवल्या. आता पुन्हा 2100 रुपये जमा होण्याची अपेक्षा असताना फक्त 1500 रुपये मिळाल्याने बहिणी निराश झाल्या आहेत. “आता तरी आश्वासन पूर्ण होईल” या अपेक्षेने डोळे लावून बसलेल्या बहिणींना सरकारच्या या निर्णयाने हिरमोड झाला आहे.
मोखाडा येथील आदिवासी भगिनी सोमी बुधा भस्मे यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले, “आत्ता तरी आम्हाला 2100 रुपये मिळतील अशी आशा होती. पण फक्त दीड हजारच आलेत. बुडत्याला काडीचा आधार म्हणत हेही नसे थोडके.” या उद्गारांमधून सरकारविषयी त्यांची नाराजी स्पष्टपणे व्यक्त होते. बहिणींना फसवून केवळ राजकीय स्वार्थ साधला जात आहे, अशी भावना अनेक भगिनींमध्ये दिसून येते.
महायुती सरकारने दिलेले वचन आणि त्याची पूर्तता यात मोठी दरी असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. निवडणुकीच्या प्रचारावेळी मोठमोठ्या घोषणा करून मतं गोळा करणाऱ्या सरकारकडून बहिणींना अधिक अपेक्षा होत्या. मात्र, सरकारने दिलेल्या वचनांची पूर्तता न केल्याने महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. लाडकी बहीण योजना हा केवळ एक राजकीय स्टंट होता का? या प्रश्नाचे उत्तर जनतेला येत्या काळात मिळेल. मात्र, सध्या तरी बहिणींच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत आहे, आणि सरकारच्या निर्णयांवर विश्वास ठेवणे कठीण होत आहे.