बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये भाजप मोहित कंबोज यांनी नाव येताच पहिली प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि बॉलीवुडमध्ये घनिष्ट संबंध असलेले बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळासह बॉलीवुडमध्ये देखील धक्का बसला होता. बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये लॉरेन्स बिश्नोई गॅंगचा हात असल्याचा दावा करण्यात आला. सलमान खानसोबत असलेल्या संबंधामुळे ही हत्या झाल्याची चर्चा करण्यात आली. मात्र आता बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांनी राजकारणातील दोन नेत्यांची नावे घेतली. यामध्ये भाजप नेते मोहित कंबोज आणि शिवसेना नेते अनिल परब यांची नावे घेतली आहे. याबाबत आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
माजी आमदार बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये झिशान सिद्दीकी यांनी आपला जबाब नोंदवला आहे. यामध्ये त्यांनी लॉरेन्स गॅंगचा कोणताही उल्लेख केलेला नाही. याउलट त्यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख केला. हत्या झाली त्या दिवशी संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान व्हॉट्स ॲपवरुन त्यांचं मोहित कंबोज यांच्याशी बोलणं झालं होतं. एका बिल्डरच्या पाठपुराव्यासाठी मोहित कंबोज यांना बाबा सिद्दीकी यांना भेटायचं होतं, असा मोठा झिशान सिद्दीकी यांनी केला आहे. मोहित कंबोज यांचे नाव समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. यावर आता सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करुन मोहित कंबोज यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मोहित कंबोज काय म्हणाले?
माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात मोहित कंबोज यांचे नाव समोर आले आहे. त्यांचे नाव समोर आल्यानंतर आता मोहित कंबोज यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “दिवंगत बाबा सिद्दीकी माझे चांगले मित्र होते. मागच्या 15 वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो. ते एनडीएचा भाग होते. निवडणुकीसह विविध विषयांवर आम्ही नियमित बोलायचो. ही घटना घडली, त्यावेळी मला धक्का बसला. त्या कठीण प्रसंगात मी त्यांच्या कुटुंबासोबत रुग्णालयात होतो. दुर्देवाने हे आम्हा सर्व मित्रांचं नुकसान झाले आहे. सत्य समोर आलं पाहिजे आणि न्यायाचा विजय झाला पाहिजे” असे मत मोहित कंबोज यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अनिल परब यांच्यावरही संशय
माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी 4500 पानी आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला फरार आरोपी ठरवलं आहे. या प्रकरणामध्ये माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांनी बड्या नेत्यांची नावे घेतल्यामुळे बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. झिशान सिद्दीकी यांनी त्यांचे वडील बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात SRA अँगलने तपास व्हावा, यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच बाबा सिद्दीकी यांचे बिल्डर लाईनमध्ये देखील संबंध असल्यामुळे त्यांनी काही मोठ्या बिल्डर आणि विकासकांची नाव देखील घेतली आहेत. अनिल परब हे एसआरए प्रकल्पात स्वतंत्र बिल्डर आणण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप झिशान सिद्दीकी यांनी केला आहे.