Baramati By Election : मुख्यमंत्री फडणवीस करणार सुनेत्रा पवारांचा प्रचार; पडळकरांचेही स्टार प्रचारकांमध्ये नाव (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राहुरी-बारामती पोटनिवडणुकीसाठी निवडणूक होणार असून, बारामतीत अखेरच्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार अशोक मोरे यांनी अर्ज मागे घेतला. मात्र, अद्यापही २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे बारामतीतही निवडणूक होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीत सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार आहेत.
भाजपने पोटनिवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला दिली असून, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. भाजपकडून जाहीर करण्यात आलेली ही यादी निवडणूक आयुक्तांना सादर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या या यादीत आमदार गोपीचंद पडळकर यांचेही नाव आहे. पवार कुटुंबीयांवर सातत्याने आरोप करणारे आणि टीका करणारे म्हणून गोपीचंद पडळकर सर्वपरिचित आहेत, तर विधानसभा निवडणुकीत त्यांनी थेट अजित पवारांविरुद्ध भाजपकडून निवडणूकही लढवली होती. आता त्यांचेच नाव स्टार प्रचारकांच्या यादीत असल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु आहे.
येत्या 23 एप्रिल रोजी बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. या स्टार प्रचारकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, नितीन गडकरी, शिव प्रकाश, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, अशोक चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे पाटील, प्रा. राम शिंदे, आशिष शेलार, राधाकृष्ण विखे पाटील आदींची नावे आहेत.
काँग्रेसची पोटनिवडणुकीतून माघार
काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. दुपारपर्यंत वरिष्ठांशी चर्चा करून अधिकृतरित्या अर्ज मागे घेतला जाईल, असे सांगितले जात होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसशी केलेल्या चर्चेनंतर अखेर काँग्रेसने आकाश मोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशीही चर्चा केली. त्यापूर्वी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशीही फोनद्वारे बातचीत केली होती.






