फोटो - सोशल मीडिया
तुळजापूर : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडला असून इच्छुकांनी देखील प्रचाराला सुरुवात केली आहे. विधानसभेच्या पूर्वी राज्याचे राजकारण रंगले आहे. सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कॉंग्रेस नेते व माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळे आमचं घर फुटलं असा घणागात मधुकरराव चव्हाण यांनी केला आहे.
मधुकरराव चव्हाण हे तुळजापूरमधील काँग्रेसचे नेते व माजी मंत्री आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीसाठी ते इच्छुक देखील आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघात संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यामध्ये मधुकरराव चव्हाण यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीपुर्वी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे चव्हाण कुटुंब फुटले. याला मधुकरराव चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना कारणीभूत मानले आहे.
लोकसभा निवडणुकच्या पूर्वी चव्हाण यांचे पुत्र आणि तुळजाभवानी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याच पार्श्वभूमीवर मधुकरराव चव्हाण यांनी फडणवीस यांच्यावर हा गंभीर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकून आमचं घर फोडले असल्याचा गंभीर आरोप मधुकरराव चव्हाण यांनी केला आहे. यामुळे आता भाजप नेते सुनील चव्हाण हे देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेचे उत्तर देणार का याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.