नवीन जीएसटी सुधारणांवरून काँग्रेसच्या नाना पटोले यांचा मोदी सरकारवर निशाणा साधला (फोटो - सोशल मीडिया)
New GST Rates : नागपूर : केंद्र सरकारकडून जीएसटीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे केवळ जीएसटीचे केवळ दोन स्लॅब असणार आहेत. आजपासून हे नवीन स्लॅब लागू झाले असून यामध्ये केवळ 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन स्लॅब असणार आहेत. यामुळे अनेक वस्तू या स्वस्त झाल्या आहेत. मात्र यापूर्वी मोदी सरकारकडून असलेल्या स्लॅबमुळे मोठे नुकसान झाले असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
नाना पटोले यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. नाना पटोले यांनी जीएसटीच्या नवीन स्लॅबवर टीका केली आहे. ते म्हणाले की, “एक म्हण आहे, ज्याचा राजा व्यापारी तिथली जनता भिकारी. मोदी सरकारने 2017 मध्ये संसदेच्या हॉलमध्ये बाबासाहेबांचे आर्थिक धोरण बदलून आरएसएस आणि भाजपचा आर्थिक धोरण आणला आणि त्यावेळी उत्सव साजरा केला. जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं तोच उत्सव नरेंद्र मोदींनी या देशात केला होता. या जीएसटीने देशातील सर्वसामान्यांना लुटून गरिबांचे पैसे लुटून देण्यात आले आणि आता सजून धजून देशाच्या जनतेसमोर आले आणि पुन्हा ते म्हणतात की हा सुद्धा एक उत्सव आहे,” अशा शब्दांत नाना पटोले यांनी टीका केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “किती वस्तूंमध्ये जीएसटी कमी केला त्याचे स्पष्टता सांगावी,ते इतर म्हणतात. जनतेला लुटण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, याचाच अर्थ अजूनही आम्ही जनतेला लुटू आणि आमच्या मित्रांना पैसे देऊ, देश आणि राज्य कर्जामध्ये बुडवू आणि देशातील लोकांना आर्थिक डबघाईस आणायचा, हाच उत्सव भाजप करताना पाहत आहोत. बाबासाहेबांचे आर्थिक धोरण बदलून, एमआरपीवाले धोरण बदलून, जीएसटीचं धोरण आणलं, त्याचा विरोध राहुल गांधी यांनी केला की हा गब्बर सिंग टॅक्स आहे. जीएसटी काही रद्द केलेला नाही, तो अजूनही चालू आहे आणि सर्वसामान्यांना लुटत जाणार आहे. आपलेच पाय लागायचे, आपल्याच हाताने आपलीच पाठ थोपटायची, हीच भूमिका मोदी आणि भाजप मानत आहेत हे यातून स्पष्ट होते,” अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पहलगाम हल्ल्यानंतर इंडिया आणि पाकिस्तानमध्ये आशिया कप सामने होत आहे. यामुळे विरोधकांनी टीका केली आहे. नाना पटोले म्हणाले की, “पहलगाममध्ये झालेल्या नंतर अजूनही ते शांत झालेलं नाही, क्रिकेटमधले अमित शहांचे जे पुत्र आहेत त्याच माध्यमातून भारत पाकिस्तान मध्ये मॅच खेळवल्या गेले, लोक मॅच बघायला गेले नाही. पाकिस्तानला धडा शिकवण्याची भूमिका भाजप का घेत नाही, भारताच्या सरकारचं काय चाललेला आहे या प्रश्नाचे उत्तर स्वतः नरेंद्र मोदी यांनी द्यावे,” अशी मागणी कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे.