यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त प्रीतीसंगम येथे डीसीएम अजित पवार यांचे अभिवादन (फोटो - टीम नवराष्ट्र)
कराड : सुसंस्कृत महाराष्ट्र घडविणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या शिकवणीचं कायम स्मरण करून मी राजकारणात काम करत आलोय. त्यांच्याच विचाराने महाराष्ट्राचे भले होणार आहे. त्यामुळे राजकीय जीवनात असेपर्यंत मी यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा कधीही सोडणार नाही, असं अभिवचन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी अभिवादन केले. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार मनोज घोरपडे, आमदार अतुल भोसले, आमदार सचिन पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आदी उपस्थित होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “सत्ताधारी व विरोधी पक्षातील काही लोक करत असलेली वादग्रस्त वक्तव्ये सुसंस्कृत महाराष्ट्राला परवडणारी नाहीत. यापूर्वी यशवंतराव चव्हाण यांच्यासह अन्य अनेक नेत्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करताना जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे. सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा, याची शिकवण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला दिली आहे. नेत्यांनी बोलताना कायदा आणि सुव्यस्थेच भान राखावे. देशात, महाराष्ट्रात देशप्रेम असणारा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नेत्यांनी भान ठेवून कोणत्याही समाजाविषयी वक्तव्य करणे शोभणार नाही. इतिहासात अनेक मोठमोठ्या लेखकांनी काही पुस्तके लिहिली, संशोधन केले, खोलवर माहिती मिळवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती, धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. त्यात मुस्लिम लोक सुद्धा आहेत. त्यामुळे राणेंनी केलेल्या वक्तव्यामागे त्याचा काय हेतू होता? मला माहित नाही. पंरतु, आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणारा मुस्लिम घटक देशप्रेमीच आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
‘छावा’मुळे इतिहास नव्या पिढीसमोर आला
छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ‘छावा’ चित्रपटाच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर आणण्याचे काम झाले आहे. तसेच हल्ली सर्वच पक्षांतील नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. आपल्या वक्तव्यातून कायदा, सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. कोणत्याही विशिष्ट समाजाबद्दल वक्तव्यं टाळली पाहिजेत, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
राज्य सरकारपुढे यशवंत विचारांचा आदर्श
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांवरच राज्य सरकार काम करीत आहे. त्यानुसारच सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम शासन करीत आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच बैठक
कोयना प्रकल्पग्रस्तांनी शंभर टक्के पुनर्रचनासाठी आज प्रीतिसंगम बागेसमोर आत्मक्लेष आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजितदादा यांना विचारले असता त्यांनी, कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच बैठक लावून ते मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मारकासाठीही प्रयत्न केले जातील. त्यांना साजेसे स्मारक उभारण्यात येईल, असेही त्यांनी यांनी सांगितले.