शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या २५ वर्षाच्या सेवा पर्वानिमित्त शिवसेना राज्यभरात सेवा से समर्पण ही गौरव यात्रा काढणार आहे. या उपक्रमाची सुरुवात आज परभणी जिल्ह्यातून झाली. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या मुलांना २५०० सायकली आणि लाडक्या बहिणींना २५०० शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज दुष्काळाचे सावट आहे. लाडका भाऊ आणि लाडकी बहिण संकटात असल्याची आपल्याला जाणीव आहे. दुष्काळाच्या सावटात बळीराजाला आणि त्याच्या कुटुंबाला शिवसेनेच्या माध्यमातून काही ना काही मदतीचा हात दिला पाहिजे, आधार दिला पाहिजे हा संकल्प आम्ही केलाय, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शिवसेनेकडून सेवा से समर्पण ही गौरव यात्रा सुरु झाली असून यात २५ हजार सायलकी, २५ हजार शिलाई मशीन, शेतकऱ्यांना आनंदाचा शिधा, गरजू वस्तूंचे वाटप, सामुदायिक विवाहांचे आयोजन केले जाईल, असे ते म्हणाले. दुष्काळाचे संकट जरी असले तरी राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.
ते पुढे म्हणाले की पंतप्रधानांनी व्यस्त दिनक्रमातही एक तास चर्चा केली. यात अर्धा तास पंतप्रधानांनी राज्यातील दुष्काळावर, लाडक्या बहिणींवर चर्चा झाली. यावर पंतप्रधानांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले, असे ते म्हणाले. दुष्काळाचे संकट मोठं आहे. राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं आहे. बळीराजाला कधी वाऱ्यावर सोडलं नाही. आताही सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. राज्याचे सर्व मंत्रिमंडळ बांधावर गेले. शेतकऱ्यांची कैफियत ऐकली. त्यांना धीर देण्याचे काम केले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे. राजकारण न करता सगळ्यांनी शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी काम केलं पाहिजे, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व राजकीय पक्षांना केले. राजकारणासाठी इतर व्यासपीठ आहेत पण या संकटकाळात शिवसेना ८० टक्के नव्हे तर १०० टक्के समाजकारण करेल, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी या कसोटीच्या काळात हार मानू नये, खचून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ते पुढे म्हणाले की, २०१४ नंतर देश आर्थिक महासत्तेकडे चालला आहे. भारताची अर्थव्यवस्था १० व्या स्थानावरुन चौथ्या स्थानावर आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केले. नेशन फर्स्ट या हेतून मोदीजी काम करत आहे. मुख्यमंत्री ते प्रधानमंत्री अशी सार्वजनिक जीवनातील २५ वर्ष मोदीजी यांनी पूर्ण केली. विरोधकांनी कितीही आरोप केले तरी मोदीजी डगमगले नाहीत. पहलगाम हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याचे काम पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भारताने केले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.






