नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना
Eknath Shinde : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या मदतीबाबत सविस्तर चर्चा झाली. नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही भागांचा स्वतः दौरा करून पाहणी करणार असून आपणही काही भागांचा पाहणी दौरा करणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.
राज्यात पावसाअभावी अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालं असून शेतकरी संकटात सापडल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तातडीने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नुकसानग्रस्त भागातील पंचनामे सुरू करण्याचे निर्देश दिल्याचं बैठकीनंतर सांगितलं.
‘बळीराजा अन्नदाता आहे. सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क त्यांचा आहे. त्यांना संकटातून बाहेर काढणं हे आमचं काम आहे,’ असं एकनाथ शिंदे म्हणाले. यापूर्वीही अतिवृष्टीसह विविध संकटांच्या काळात सरकारने मदत केल्याचं त्यांनी नमूद केलं.
अधिकारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करतील आणि त्यानुसार पंचनामे केले जातील, असं शिंदे यांनी सांगितलं. दुष्काळ निवारणासाठी विशेष उपसमिती स्थापन करण्यात आल्याची माहितीही बैठकीनंतर समोर आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना आपापल्या भागात जाण्याच्या सूचना दिल्याचं सांगितलं. गावागावात जनता दरबार घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता यावरही सरकारकडून नियोजन करण्यात येणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. पुढील काळात सरकारकडून मदत केली जाईलच, मात्र शिवसेनाही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काही जबाबदारी घेईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्री आणि प्रशासनाने प्रत्यक्ष मैदानात उतरावं, अशी भूमिका शिंदे यांनी मांडली. नुकसानग्रस्त भागातील पंचनामे, पाणी आणि चारा या मुद्द्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, दुष्काळ निवारणासाठी विशेष समितीला मंत्रिमंडळाचे अधिकार देण्यात आले असून परिस्थितीचा नियमित आढावा घेतला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.






