शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; बड्या नेत्याने सोडली साथ
सातारा : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. नगरपरिषदांसह नगरपंचायतीच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. असे असताना आता या निवडणुकीपूर्वी साताऱ्यातील रहिमतपूर येथे मोठ्या घडामोडी घडत आहेत. रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला.
रहिमतपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सुनील माने यांनी ही माहिती दिली. त्यांच्या समवेत धामणेरचे माजी सरपंच शहाजीराव क्षीरसागर व वाठार किरोली जिल्हा परिषद गटाचे नेते संभाजीराव गायकवाड, रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष आनंदा कोरे यांची उपस्थिती होती. सुनील माने म्हणाले, गेल्या 10 ते 11 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी काम करत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर वैयक्तिक कारणामुळे अजित पवार गटात प्रवेश केला नव्हता. मात्र, रहिमतपूर व परिसरातील कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर सर्वांच्या आग्रहाखातर अजितदादा गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
हेदेखील वाचा : Explainer: बिहारचे मतदान वाढल्यामुळे NDA, महाआघाडी सर्वच खुष, कारण वाचून तुमचंही डोकं गरगरेल; वाचा खरी कहाणी
येत्या रविवारी (दि.9) सायंकाळी सहा वाजता रहिमतपूर येथील गांधी चौकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. यावेळी कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, ज्येष्ठ नेते संभाजीराव गायकवाड यांच्यासह रहिमतपूरमधील अनेक माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांचा हा प्रवेश सोहळा होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नेतृत्व सर्वसमावेशक
यावेळी शहाजीराव क्षीरसागर म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व सर्वसमावेशक आहे. परिसराच्या व गावच्या हिताचा विकासाचा विचार करून अजित पवार गटात प्रवेश करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून परिसराच्या विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध होऊ शकतो. तसेच कार्यकर्त्यांचेही मत अजित पवारांच्या गटात प्रवेश करण्याचे झाले होते. यामुळे आम्ही शरदचंद्र पवार गटातून अजित पवारांच्या गटात प्रवेश करत आहे.
बाळासाहेब पाटील यांच्यासाठी धक्का?
सुनील माने यांनी शरदचंद्र पवार गटात दिलेला राजीनामा हा शरदचंद्र पवार तसेच माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासाठी खूप मोठा धक्का आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर जिल्ह्यातून अनेक नेत्यांनी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा सपाटा लावला होता. त्याचवेळी सुनील माने हे अजित दादांचे कट्टर समर्थक समजले जात असताना त्यांनी मात्र शरदचंद्र पवार गटाची जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळून ठेवली. मात्र, त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लोकसभा निवडणुकीत व विधानसभा निवडणुकीतही पक्षाला सातारा जिल्ह्यात मोठ्या पराभवाचे तोंड पहावे लागले होते.
हेदेखील वाचा : Bihar Elections 2025: दिल्ली आणि बिहार, दोन्ही राज्यांमध्ये भाजप नेत्याचे मतदान; आप’चा आरोप, नेमक काय आहे प्रकरण?






