(Photo - X)
मुंबई : भाजपकडून देशभरात लोकशाही आणि संविधान बचाव रॅली आयोजित केल्या जात आहेत. काल (रविवार, 1 नोव्हेंबर) INDIA आघाडीकडूनही ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर जोरदार आंदोलन पार पडले. यावरूनच आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
“भाजपच्या तोंडात संविधान आणि मनात मनुस्मृती असल्याची टीका करत हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही आरोप केले आहेत.
भाजप व मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका करत सपकाळ म्हणाले, “दिल्लीतील रामलीला मैदानावरील ‘वोट बचाओ, देश बचाओ’ या इंडिया आघाडीच्या अभूतपूर्व महारॅलीने दिल्लीतील मोदी सरकारला प्रचंड हादरे बसले आहेत. या महारॅलीचा धसका घेतल्याने भाजपा देशभर लोकशाही बचाओ, संविधान बचाओ रॅली करत आहे, परंतु संविधान व लोकशाहीचे खरे मारेकरी भाजपा व RSS हेच आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संविधान व लोकशाही वरून काँग्रसवर आरोप करणे हे हास्यास्पद आहे.”
“भाजपाची मातृसंस्था RSS ला बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानच मान्य नाही, भाजपावाले तर उघडपणे संविधान बदलाची भाषा करत आहेत. भाजपाच्या तोंडात संविधान आणि मनात मनुस्मृती आहे. त्यामुळे भाजपाची ‘लोकशाही व संविधान बचाओ’ची आगपाखड म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ आहेत,” असे प्रत्युत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.
भाजपा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, “१३ वर्ष सत्तेत राहुनही भाजपा आजही जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राहुल गांधी यांच्यावरच आरोप करत आहे. त्यांनी काय दिवे लावले हे सांगत नाही. २०२४ च्या निवडणुकीत वोटचोरी करून मोदी व फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले आहे, त्यांची वोटचोरी पकडली असून त्यांची सत्ता तर जाणारच आहे पण सत्ता गेल्यानंतर कारवाई होणार या भितीने त्यांची झोप उडाली आहे.”
“मोदी-शाह सरकार ज्ञानेशकुमारांच्या मदतीने १३ कोटी नागरिकांना मतदानापासून वंचित ठेवत आहे. हा संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार भाजपा सरकार हिरावून घेत आहे. घुसखोरांची भाषा करतात पण किती घुसखोर पकडले हे मात्र सांगत नाहीत. फडणवीस यांच्यात हिम्मत असेल तर घुसखोरांची आकडेवारी जाहीर करावी, घुसखोरांच्या नावाखाली नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेऊ नका. लोकशाहीत रेजिम चेंज म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन आणि राजकीय पक्ष त्यासाठीच असतात त्याची मोदी, शाह, फडणवीसांना एवढी भिती का आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सर्व संविधानिक संस्थांवर ताबा मिळवून लोकशाही हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरु आहे. संविधानिक संस्था विद्यापीठात संघ आणि भाजपाशी संबंधित माणसे घुसवली असून त्या एकप्रकारे ताब्यात घेतल्या आहेत. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाला नोटीसही पाठवत नाही. न्यायपालिकेत भाजपा सरकारचा हस्तक्षेप प्रचंड वाढला आहे, हे निवृत्त न्यायाधीशच उघडपणे सांगत आहेत.निवडणूक आयोगाचा कारभार तर आंनदी आनंदच आहे,” असे म्हणत त्यांनी संविधानिक संस्थांवरदेखील प्रश्न उपस्थित केले.
“भारतीय जनता पक्षाने संविधान बदलण्यासाठीच लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला होता. सत्तेत आल्यावर संविधान बदलू असे भाजपच्या अनेक नेत्यांनी जाहीर सभांमधून सांगितले होते हे फडणवीस सोयीस्कररित्या विसरले आहेत,” असे ते म्हणाले.
“विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हातातील लाल कव्हरचे संविधान भाजपाला का खटकते? भाजपाने लाल रंगाचा इतका धसका का घेतला आहे? राहुल गांधी हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानच दाखवत आहेत. भाजपाची आगपाखड ही त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने होत आहे, त्यांची चोरी पकडल्याने ते आकांडतांडव करत आहेत.”
“राहुल गांधी ‘किस खेत की मुली’, म्हणता मग इतका तिळपापड कशासाठी? कोण राहुल? येथून सुरु झालेला प्रवास आता मोदी-शाह यांच्या सत्तेला हादरे देऊ लागला आहे. मोदी-शाह यांना झोपतही राहुल गांधीच दिसू लागले आहेत आणि भितीने ते घाबरले आहेत,” असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
Ans: भाजपच्या तोंडात संविधान आणि मनात मनुस्मृती असल्याची टीका करत सपकाळ यांनी भाजप आणि RSS यांच्यावर संविधानविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप केला.
Ans: निवडणूक प्रक्रियेतून १३ कोटी नागरिकांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. घुसखोरांच्या नावाखाली सामान्य नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेऊ नये, असंही ते म्हणाले.
Ans: घुसखोरांचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या फडणवीसांनी किती घुसखोर पकडले, याची आकडेवारी जाहीर करावी, असं आव्हान सपकाळ यांनी दिलं.






