मोठी बातमी ! शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढणार? आयकर विभागाने बजावली नोटीस(फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयकर विभागाने त्यांना नोटीस बजावली आहे. याबाबतची माहिती खुद्द शिरसाट यांनी दिली आहे. आयकर विभागाच्या नोटिशीमुळे राजकीय वतुर्ळात एकच चर्चा सुरु आहे.
मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्या ‘विट्स हॉटेल’ची चर्चा सुरु आहे. छत्रपती संभाजीनगरातील विट्स हॉटेलची किंमत 110 कोटी रुपये असताना, ते केवळ 67 कोटी रुपयांना संजय शिरसाट यांच्या मुलाने विकत घेतले, असा आरोप होत आहे. याप्रकरणाच्या चौकशीची मागणी विरोधकांकडून केली जात होती. असे असताना आता आयकर विभागाने नोटीस बजावली आहे.
हेदेखील वाचा : महाराष्ट्रात राजकारणातही सुरु आहे कुस्ती; उचलून आपटून मारण्याच्या धमक्यांनी मैदान गाजले
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नुकतीच मोठी घोषणा केली. छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल विट्सच्या विक्रीत सहभागी असलेल्या निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले. या प्रकरणात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत यांची कंपनीही सहभागी होती. त्यानंतर आता आयकर विभागाने ही नोटीस बजावली आहे.
अंबादास दानवेंनी उपस्थित केला प्रश्न
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी एक प्रस्ताव मांडला होता, ज्याच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. हॉटेलच्या विक्रीसाठी रद्द केलेल्या निविदा प्रक्रियेवर दानवे यांनी प्रश्न उपस्थित केले होते.
सहा वेळा निविदा काढण्यात आल्या
विट्स हॉटेल ही धांडा कॉर्पोरेशन लिमिटेडची मालमत्ता होती. ही कंपनी मुंबई शेअर बाजारात लिस्टेड आहे. 2016 आणि 2017 मध्ये या हॉटेलसह कंपनीची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी हॉटेलचा लिलाव करण्यात येत होता, अशीही माहिती सध्या समोर येत आहे.
जलील यांच्या तक्रारीनंतर नोटीस?
एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या तक्रारीनंतर शिरसाट यांच्याकडे आयकर खात्याची वक्रदृष्टी वळाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
संपत्ती वाढली कशी?
2019 साली निवडणुकीत तुमची संपत्ती इतकी होती तर 2024 साली तुमची संपत्ती इतकी कशी झाली? असं नोटिशीत विचारण्या आल्याचे शिरसाट यांनी सांगितले. याबाबत त्यांना नऊ तारखेला खुलासा करण्याबाबत सांगितलं होतं, अशी माहिती देखील संजय शिरसाट यांनी दिली आहे. पैसे कमावणे सोपं आहे. पण, वापरणं अवघड असल्याचे त्यांनी सांगितले.