मतदार यादीत संशयास्पद नावे आणि बरचं काही..; पुरावे दाखवत मालेगावच्या उपसरपंचाचे मतचोरीचे आरोप
Malegaon Vote Rigging News: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या महिन्यात केंद्रीय निवडणूक आयोगावर मतचोरीचे गंभीर आरोप केले होते. त्यावरून त्यांनी भाजपवरदेखील टीका केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील मालेगावच्या मध्य व बाह्य विधानसभा मतदारसंघांतून मतचोरीचा मुद्दा समोर आला आहे. यावरून पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मालेगावचे माजी उपमहापौर नरेंद्र सोनवणे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत ‘मत चोरी’चे गंभीर आरोप केले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी यावेळी स्लाइड शोच्या माध्यमातून थेट पुरावे दाखवले आहेत.
मालेगाव महापालिका हद्दीतील पूर्वीच्या आठ आणि सध्याच्या ९ क्रमांकाच्या एकाच प्रभागातील मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ असल्याचे आढळले आहे. या यादीत जवळपास ३ हजार नावे दुबार असल्याचे निदर्शनास आले आहे. नरेंद्र सोनावणे म्हणाले की, मतदारयादीत काही नावे संशयास्पद असून त्यात वेगवेगळ्या छायाचित्रांचा वापर केला गेला आहे. तसेच घराचा पत्त्याचा रकाना पूर्णपणे रिकामा आहे. याशिवाय मतदारयादीत अनेक मतदारांच्या घरांचा पत्त्याचा उल्लेखच करण्यात आलेला नाही. तसेच, प्रशासकीय आशीर्वादाशिवाय हे शक्य नसल्याचा आरोपही सोनवणेंनी केला आहे.
मालेगाव महापालिका निवडणुकीच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आणि फेरफार असल्याचेही सोनावणेंनी म्हटले आहे. ९ क्रमांकाच्या प्रभागातील मतदार यादीबद्दल संशय आल्यावर त्यांनी यासंदर्भात तपास सुरू केला आणि काही गंभीर व धक्कादायक बाबी समोर आल्या.
प्रभाग क्रमांक ९ च्या मतदारयादीत अनेकांची नावे दोन दोन वेळा आहेत, तर काहींची नावे तर चक्क चार वेळा समाविष्ट करण्यात आली आहेत. एकाच व्यक्तीचे वेगवेगळ्या ठिकाणी भिन्न छायाचित्र वापरण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर, अनेक मतदारांच्या पत्त्याच्या रकान्यात शून्य किंवा फक्त रेषा दाखवल्या गेल्या आहेत. शेजारीच्या बागलाण मतदार संघ, धुळे आणि नाशिक शहरातील अनेक मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने या प्रभागात घुसडवण्यात आल्याचा दावाही सोनावणे यांनी केला आहे.
Ranbir Kapoor Birthday: नेपो कीड अजूनही, रणबीरला करावा लागला संघर्ष; अभिनय कौशल्यने बनला
मालेगाव महापालिका निवडणुकीच्या मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्यामुळे बोगस मतदान होण्याचा धोका वाढला आहे. मतदार यादीतील संशयास्पद नावे लोकशाहीला धक्का पोहोचवत असल्याचे सोनवणे यांनी म्हटले आहे. या सर्व प्रकाराबाबत तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार नोंदवल्या असूनही अद्याप ही बोगस नावे यादीतून काढण्यात आलेली नाहीत. असा आरोपही त्याी केला. बीएलओंनी मतदार यादीत घोळ केल्याचा आरोप करत या प्रकरणी तहसीलदार आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच, या प्रकरणात आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ‘एसआयटी’ गठीत करून चौकशी करण्याची मागणी करणार आहेत. गरज असल्याच उच्च न्यायालयात देखील याचिका दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.