(Photo - X)
Manoj Jarange Audio Clip Row : मनोज जरांगे पाटील यांनी सादर केलेल्या ऑडिओ क्लिपनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असल्याचे चित्र दिसत आहे. मनोज जरांगे पाटलांना मॅनेज करण्यासाठी भाजपकडून श्रीकांत शिंदेंमार्फत 500 कोटी रुपये घेतले असल्याचा दावा या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात येत आहे. यावरून राज्याच्या राजकारणात चर्चाना उधाण आले असून भाजप आणि शिवसेना शिंदेगटात चांगलीच जुंपली असल्याचं दिसत आहे.
शिंदेगट आणि भाजप नेत्यांनी यावरून एकमेकांवर चिखलफेक करायला सुरुवात केली असून आता हा वाद आणखीनच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. अश्यातच आता शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. तब्बल तीन दिवसांनंतर श्रीकांत शिंदेंनी याप्रकरणावर भाष्य केलं असून यावर मिश्किल टिपण्णी केली आहे.
श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना या कथित पैशांच्या व्यवहारावर उपरोधिक भाष्य केलं. “मनोज जरांगे पाटलांना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही पडलाय. 500 कोटी रुपये कुणाकडे गेले, पण माझ्यापर्यंत कसे पोहोचले नाहीत?” अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली.
“एवढी मोठी रक्कम एकत्र ठेवण्यासाठी किती गाड्या लागतील, यावरही आपली चर्चा सुरू आहे. पैसे नेमके कुणी घेतले, याचा शोध घेतला पाहिजे. तुम्हाला काही कळलं तर मला सांगा, मला कळलं तर मी सांगतो,” असं म्हणत त्यांनी मिश्किल अंदाजात टोला लगावला.
मनोज जरांगे यांनी काही लोकांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप ऐकवली होती. या क्लिपमध्ये भाजपकडून 500 कोटी रुपये दिल्याचा आणि जरांगे यांना मॅनेज करण्यासाठी पैसे वापरल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. जरांगे यांच्या म्हणण्यानुसार, हे पैसे एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आणि त्यांनी ते श्रीकांत शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवले. या दाव्यावर एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट उत्तर द्यावं, असं आवाहनही जरांगे यांनी केलं. भाजप नेमका कुणाचा राजकीय गेम करत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
या प्रकरणाची शिंदे गटाने गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीनंतर चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली.
आता या कथित ऑडिओ क्लिपची सत्यता काय, त्यातील संभाषणाचा संदर्भ नेमका कोणता आणि 500 कोटींच्या दाव्यात तथ्य आहे का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या या धुरळ्यात प्रत्यक्ष चौकशीतून काय निष्पन्न होतं, हेच महत्त्वाचं ठरणार आहे.
Ans: मनोज जरांगे यांनी एका ऑडिओ क्लिपचा संदर्भ देत भाजपकडून 500 कोटी रुपये दिल्याचा आणि त्यांचा वापर जरांगे यांना मॅनेज करण्यासाठी झाल्याचा दावा केला.
Ans: श्रीकांत शिंदे यांनी ‘माझ्यापर्यंत पैसे आलेच नाहीत’ असं मिश्किलपणे म्हटलं. पैसे नेमके कुणी घेतले, याचा शोध घेतला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
Ans: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. चौकशीचा अंतिम निष्कर्ष काय आहे, हे अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच स्पष्ट होईल.






