मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी नारायण गडावर दसरा मेळावा घेत मराठा समाजाला संबोधित केले (फोटो - सोशल मीडिया)
Jarange Patil Dasara Melava Live : नारायणगड : विजयादशमीच्या निमित्ताने राजकीय वर्तुळामध्ये मेळावे होत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील दसरा मेळावा घेतला आहे. मागील वर्षापासून जरांगे पाटील हे देखील दसरा मेळावा घेत मराठा समाजाला संबोधत असतात. यावेळी देखील त्यांनी नारायणगडावर दसरा मेळावा घेतला आहे. हातामध्ये सलाईनची सुई असताना देखील जरांगे पाटील हे मराठा समाजाला विचारांचं सोनं देण्यासाठी नारायणगडावर आले.
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांचा आज बीड जिल्ह्यातील नारायण गडावर मोठा दसरा मेळावा झाला. यावेळी मोठ्या संख्येने जरांगे पाटील यांचे समर्थक गडावर दाखल झाले होते. सध्या राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी कोलमडून गेला आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा साध्या पद्धतीने साजरा करायचा निर्णय जरांगे यांनी घेतला आहे. असे असले तरी हजारोंच्या संख्येने लोक जरांगे यांच्या दसरा मेळाव्याला आले आहेत. हातामध्ये भगवा झेंडा घेतलेले अनेक समर्थक हे जरांगे पाटील यांच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी माझ्या नादी लागायचं नाही, असा आक्रमक पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात घेतला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दसरा मेळाव्याच्या एक दिवस अगोदर जरांगे यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मराठा समाजासाठी जरांगे पाटील हे प्रकृती खराब असताना देखील मेळाव्याला उपस्थित राहिले. यावेळी त्यांच्या एका हाताला सलाईनची सुई लावलेली दिसली. तसेच त्यांचा चेहरा थकलेला होता. उठतानाही त्यांना त्रास होत आहे. जरांगे दसरा मेळाव्यासाठी लोकांना संबोधित करण्यासाठी आले. त्यांनी खुर्चीवर बसूनच जमलेल्या मराठा बांधवांशी संवाद साधला.
मी थोड्या दिवसाचा पाव्हणा
यावेळी जरांगे पाटील यांनी पुन्हा आरक्षणावर भाष्य केले. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आज खासदारांपासून आमदारांपर्यंत सर्वच जणांनी या पवित्र नारायण गडाच्या कुशीत येऊन मोठेपण सिद्ध केलं. मला बोलताना खूप त्रास आहे. आपला गड नगद आहे म्हणून मला ताकद मिळतेय. मला ताकद मिळाली तशी शेतकऱ्यांना मिळावी. खूप वेदना आहेत, शररीरात ताकद नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, आठवत असली तर बघा. एक पाच सहा महिन्यापूर्वी सांगितलं होतं. प्रत्येकाला सांगितलं होतं. मी थोड्या दिवसाचा पाव्हणा आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणताच संपूर्ण मराठा समाज शांत बसलेला दिसून आला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, आपण मुंबईला जायची हाक दिली, तेव्हा मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती. शेवटी शरीर आहे. काही सांगता येत नाही. माझ्या गरिबाच्या लेकराच्या आयुष्याचं कल्याण करू द्या. मुंबईला चला, कारण मी त्याचवेळी ही गोष्ट सांगितली होती. मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकरांना आरक्षण दिलेलं पाहायचं आहे. मागे कोणी हटू नका. कुणी मागे सरकू नका. अशी संधी पुन्हा सोडू नका. तुम्ही आता साथ दिली, त्यामुळे माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण करू शकतो, तुम्ही साथ दिली आपण जीआर घेऊन लढाई जिंकली. आता मला चिंता नाही. मी थोड्या दिवसाचा पाव्हणा असो की लय दिवसाचा. मला चिंता राहिली नाही. दिवाळीपूर्वी सर्वांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले.
जो नेता बोलेल त्याला त्याच्या जातीमध्ये तोलायचं
पुढे मराठा नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राजकीय नेता असला तरी गुंड असला तरी हात जोडून उभं राहावं लागतं. तुम्ही पीएसआय बनला तर त्याला प्रशासन म्हणायचं. कलेक्टर, एसपी, पीएसआय बनला तर कोणताही दादा तुमच्या हात जोडून उभा राहिल. कोणताही नेता तुमच्या समोर हात जोडून उभा राहील. समजून घ्या. कष्ट करा आणि पळा एवढंच करू नका. यापुढे ओबीसी समाजाला काही बोलायचं नाही. राजकीय नेते बाराचे आहेत तर आम्ही चौदाचे आहोत.छगन भुजबळ तर बावचळल्यावाणी करतात. जो नेता बोलेल त्याला त्याच्या जातीमध्ये तोलायचं, अशी टीका मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.