मुंब्रामध्ये मराठी तरुणाला मराठी भाषा बोलत असल्यामुळे माफी मागायला लावली यावर अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : मुंबईमध्ये मराठी भाषा सुरक्षित नसल्याचे दिवसेंदिवस समोर येत आहे. मराठी भाषिक लोकांना मराठी बोलण्यापासून रोखले जात आहे. मराठी बोलल्यानंतर मराठी तरुणांना मारहाण आणि माफी मागायला लावली जात आहे. मुंबईजवळ मुंब्रा येथे मराठी तरुणाला मराठी बोलण्याचा आग्रह धरायला लावल्यामुळे माफी मागायली लावली आहे. मुंबईतील महिन्याभरातील हा दुसरा प्रकार आहे. यामुळे आता रोष व्यक्त केला असून मनसे नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मुंबईतील मुंब्रामध्ये पुन्हा एकदा मराठी भाषेला आव्हान देणारी घटना घडली आहे. महाराष्ट्राची राज्यभाषा असलेली मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मात्र फक्त दर्जा मिळाला असला तरी महाराष्ट्रामध्येच मराठी बोलणाऱ्या भाषिकांवर रोष व्यक्त केला जात आहे. तसेच मुंब्रामध्ये मराठी भाषेचा आग्रह धरणाऱ्या तरुणाला माफी मागायला लावल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.
नेमका प्रकार घडला काय?
मुंब्रामध्ये एक मराठी तरुणाने एका भाजी विक्रेत्याकडून फळ घेत असताना भाषेवरुन वाद झाला. मराठी तरुणाने फळ विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितले. त्यावरुन वाद झाला. मला मराठी येत नाही. मी हिंदीत बोलणार, असं फळ विक्रेता बोलताच मराठी तरुण “महाराष्ट्रात रहायचे असेल तर मराठी आलेच पाहिजे, मी मुंब्रा बंद करुन टाकेन”, असं बोलू लागला. यामुळे इतर फळ विक्रेते आणि स्थानिक रहिवाशी यांनी येवून मराठी तरुणाला घेरले. मुंब्र्यात मराठी-हिंदी वाद का करतो, मुंब्रा शांत आहे शांत राहू दे, असं मुंब्र्यातील स्थानिक बोलू लागले. यामुळे वाद चिघळला आणि मराठी तरुणाला माफी मागायला जमावाने भाग पाडले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काही दिवसांपूर्वी कल्याण पश्चिमेतील अजमेरा हाईटस उच्चभ्रू सोसायटीमध्ये असाच प्रकार घडला होता. एका अमराठी कुटुंबाने काही लोकांच्या मार्फत मराठी कुटुंबातील लोकांना मारहाण केली होती. इमारतीमध्ये अखिलेश शुक्ला आणि शेजारी असणाऱ्या कल्वीकट्टे कुटुंबात किरकोळ वाद झाला. त्यात शुक्ला यांनी 10 ते 15 जणाच्या टोळीला बोलवून सोसायटीतील तीन जणांना रॉडने मारहाण केली असून, यामध्ये 2 – 3 जण जखमी झाले होते. आता पुन्हा एकदा मराठी बोलण्यावरुन मराठी तरुणाला माफी मागायला लावण्यास भाग पाडले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या घटनेवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. अविनाथ जाधव यांनी मुंब्रातील घटनेनंतर सोशल मीडियावर रोष व्यक्त करत मराठी माणसाला खडेबोल सुनावले आहे. अविनाश जाधव यांनी लिहिले आहे की, मराठी बोलणं गुन्हा ठरलाय, मराठीसाठी माफी मागावी लागतीये तेही महाराष्ट्रात! हे आता मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रत्येक चौकात होणार, आणि मराठी माणूस फक्त पाहत राहील. याच साठी महाराष्ट्राला राज साहेब हवे होते… आता भोगा कर्माची फळ…’ असे त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.