बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये मोहित कंबोज व अनिल परब यांची नावे आली आहेत (फोटो - टीम नवराष्ट्र)
मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक दावे समोर आले. बाबा सिद्दीकी यांचे बॉलीवुडमधील कलाकारांसोबत आणि खासकरुन सलमान खानसोबत संबंध असल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली असा दावा करण्यात आला होता. लॉरेन्स बिश्नोई गॅंगकडून ही हत्या करण्यात आल्याचे देखील बोलले गेले. मात्र आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये आता दोन बड्या राजकीय नेत्यांची नावे समोर आली आहे. शिवसेना व भाजपच्या या नेत्यांच्या नावामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी 4500 पानी आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला फरार आरोपी ठरवलं आहे. या प्रकरणामध्ये माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. झिशान सिद्दीकी यांनी आपल्या जबाबामध्ये बिश्नोई गॅंगचा कोणताही उल्लेख केलेला नाही. मात्र त्यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि भाजप नेते मोहित कंबोज यांची नाव घेतली आहेत. या बड्या नेत्यांची नावे घेतल्यामुळे बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
झिशान सिद्दीकी यांनी त्यांचे वडील बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात SRA अँगलने तपास व्हावा, यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच बाबा सिद्दीकी यांचे बिल्डर लाईनमध्ये देखील संबंध असल्यामुळे त्यांनी काही मोठ्या बिल्डर आणि विकासकांची नाव देखील घेतली आहेत. अनिल परब हे एसआरए प्रकल्पात स्वतंत्र बिल्डर आणण्याचा प्रयत्न करत होते. बाबा सिद्दीकी हे डायरी लिहायचे. हत्या झाली त्या दिवशी संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान व्हॉट्स ॲपवरुन त्यांचं मोहित कंबोज यांच्याशी बोलणं झालं होतं. एका बिल्डरच्या पाठपुराव्यासाठी मोहित कंबोज यांना बाबा सिद्दीकी यांना भेटायचं होतं, असा मोठा झिशान सिद्दीकी यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाबाबत मुलगा झिशान सिद्दीकी यांनी जबाब दिला असून त्यांचे चार पानी स्टेटमेंट आहे. त्यात त्यांनी ज्या-ज्या बिल्डरांची नाव घेतली आहेत, त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी तपास करावा असं म्हटलं आहे. माझे वडिल दोन दिवसांनी विधान परिषदेवर शपथ घेणार होते. पण त्याआधीच 12 ऑक्टोबरला त्यांची गोळी मारुन हत्या झाली, असं झिशानने सांगितलं. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर 15 ऑक्टोबर 2024 विधान परिषदेसाठी नामांकित केलेल्या नेत्यांनी शपथ घेतली. त्यामुळे राजकीय संशय देखील झिशान सिद्दीकी यांनी व्यक्त केला असून सुरु असलेल्या तपासवर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात राजकीय नेत्यांची नावे समोर आल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.