BJP Election Strategy: पद्म पुरस्कारांतून भाजपची 'केरळ'निवडणूक रणनीती; टीकाकारांच्या सन्मानातून भाजप नेमकं काय साधू पाहतयं?
भाजप आणि आरएसएसचे प्रखर टीकाकार असूनही अच्युतानंदन यांचा गौरव करून भाजपने “आम्ही वैचारिक मतभेदांच्या पलीकडे जाऊन कामाचा आदर करतो,” असा संदेश दिला आहे. केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. डाव्या विचारसरणीच्या बालेकिल्ल्यात शिरकाव करण्यासाठी आणि सामान्य मतदारांमध्ये सकारात्मक प्रतिमा तयार करण्यासाठी ही भाजपची रणनीती असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. पुरस्कारांमुळे केरळच्या राजकारणात नवे समीकरण पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्र सरकारने झारखंडचे दिग्गज आदिवासी नेते शिबू सोरेन यांना ‘पद्मभूषण’ जाहीर केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. या पुरस्काराकडे केवळ सन्मान म्हणून न पाहता, भाजप आणि झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) यांच्यातील संभाव्य जवळीकीचा संकेत म्हणून पाहिले जात आहे.
त्याचवेळी बिहार निवडणुकीत एनडीएच्या प्रचंड विजयानंतर, हेमंत सोरेन यांचा पक्ष काँग्रेसपासून फारकत घेऊन भाजपसोबत हातमिळवणी करू शकतो, अशीही चर्चा सुरू आहे. सर्व प्रयत्नांनंतरही झारखंडमधील आदिवासी मतपेढी पूर्णपणे भाजपच्या बाजूने वळलेली नाही. त्यामुळे शिबू सोरेन यांच्या प्रभावाचा वापर करून या वर्गाला आपलेसे करण्याची भाजपची रणनीती असल्याचे मानले जात आहे. या संदर्भात, हेमंत सोरेन आणि त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन एका वरिष्ठ केंद्रीय मंत्र्याची भेट घेतल्याचा बातम्याही समोर आल्या आहे. त्यानंतरच केंद्र सरकार शिबू सोरेन यांना भारतरत्न किंवा पद्मश्री देऊन झारखंड मुक्ती मोर्चाला राजकीय संकेत देऊ शकते.
मोदी सरकारने वैचारिक किंवा राजकीय विरोधकांना सन्मानित करण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी अनेक वेळा सरकारने प्रमुख राजकीय नेत्यांना पद्मविभूषण किंवा भारतरत्न प्रदान केले आहे, विशेषतः महत्त्वाच्या निवडणुकीच्या काळात.
२०२३ मध्ये मुलायम सिंह यादव यांना पद्मविभूषण (मरणोत्तर)
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न
२०२४ च्या आंध्र प्रदेश निवडणुकीपूर्वी पी.व्ही. नरसिंह राव यांना भारतरत्न (मरणोत्तर)
२०२१ मध्ये आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांना पद्मभूषण
२०१७ मध्ये शरद पवार यांना पद्मविभूषण
२०२२ मध्ये गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण
याशिवाय, मोदी सरकारने काँग्रेसचे एस.सी. जमीर, तोखेहो सेमा, पीडीपी नेते मुझफ्फर बेग आणि अकाली दलाचे तरलोचन सिंग यांना पद्म पुरस्कार प्रदान केले आहेत. २०२४ मध्ये, सरकारने पी.व्ही. नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान केले. त्याच वर्षी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि कृषी शास्त्रज्ञ एम.एस. स्वामीनाथन यांनाही भारतरत्न प्रदान करण्यात आले. २०२२ मध्ये, पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांना पद्मभूषण देण्याची ऑफर देण्यात आली होती, परंतु त्यांनी नकार दिला.






