चंद्रपूर महापालिकेत महाविकास आघाडी एकत्र येणार; उद्धव ठाकरे-वडेट्टीवार यांच्यात चर्चा (File Photo : MVA)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून भाजपसह इतर अनेक पक्षांकडून महापालिका सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यातच आता चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा महापौर व्हावा, यासाठी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी ‘मातोश्री’वर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीत चंद्रपूर महापालिकेत महाविकास आघाडी सोबत राहणार असल्याची सकारात्मक चर्चा झाली.
चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर बसावा म्हणून शिवसेने (उबाठा) चे ६ आणि वंचितच्या २ नगरसेवकांनी काँग्रेसला पाठिंबा द्यावा, यासाठी विजय वडेट्टीवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मातोश्रीवर दोन्ही नेत्यांमध्ये ३० मिनिटे झालेल्या चर्चेत शिवसेनेकडून अडीच वर्ष महापौर आणि स्थायी समिती पदाची मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेकडून काँग्रेस बरोबर पुढील चर्चेची जबाबदारी खासदार अनिल देसाई आणि विनायक राऊत यांना देण्यात आली आहे. ‘मातोश्री’वर झालेल्या चर्चेनंतर वडेट्टीवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत ‘मातोश्री’ भेटीचा तपशील देत त्यांच्याशी चर्चा केली.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: वडगाव मावळमध्ये अनोखा अंदाज; एकूण 15 जागांवर ‘मविआ’ म्हणून ‘हे’ पक्ष लढणार
दरम्यान, चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर व्हावा हे माझे प्राधान्य आहे. अकोला आणि परभणी इथे शिवसेने (उबाठा) ला काँग्रेसची मदत लागणार आहे. तसेच चंद्रपुरात काँग्रेसला शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज आहे. याबाबत चर्चा होऊन लवकरच तोडगा निघेल. हर्षवर्धन सपकाळ हे सुद्धा ‘मातोश्री’बरोबर चर्चा करतील, असे काँग्रेस विधिमंडळनेते वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी काँग्रेसचा गट संपर्कात असल्याचा दावा केला. हा दावा म्हणजे तोंडाच्या वाफा काढणे आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
मावळ तालुक्यात महाविकास आघाडी एकत्र
मावळ तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे आणि वंचित बहुजन आघाडी या पाच पक्षांनी तालुक्यातील एकूण १५ जागांवर आघाडी म्हणून निवडणूक लढवण्यावर एकमत केले आहे.






