गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वादग्रस्त विधानावर खासदार संजय राऊत यांची टीका (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : पुण्यामध्ये मध्यवर्ती भागामध्ये आणि वर्दळ असणाऱ्या स्वारगेट बसस्थानकावर तरुणीवर अत्याचार करण्यात आला. 26 वर्षीय तरुणीवर दत्तात्रय गाडे या नराधमाने अत्याचार केला. पहाटेच्या सुमारास हा प्रकार करुन नराधम त्याच्या गावी फरार झाला होता. पोलिसांच्या दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर अखेर दत्तात्रय गाडे याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी काल (दि.27) गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बसस्थानकावर जाऊन पाहणी केली. तसेच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबतचर्चा करुन प्रकरणाचा आढावा घेतला. यानंतर पत्रकार परिषद घेत योगेश कदम यांनी पोलिसांची गस्त सुरु होती. स्वतः पीआय गस्त घालत असल्याचे देखील स्पष्ट केले. तसेच या प्रकरणामध्ये पोलीस पूर्ण प्रयत्नांनी तपास करत आहेत. असे सांगितले. याचबरोबर पीडित मुलीने घटना होत असताना आरडाओरड केली नाही. यामुळे आरोपीला क्राईम करताना सोपे गेले. आरडाओरड केली असती तर आसपासच्या लोकांनी मदत केली असती. बसस्थानकावर 10 ते 12 लोक असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याचे योगेश कदम म्हणाले आहेत. यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. यावरुन ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. खासदार राऊत यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी योगेश कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत ?
माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी योगेश कदम यांच्या वक्तव्यावरुन त्यांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी खासदार राऊत म्हणाले की, आरोपीला पकडून पोलीस सरकारने उपकार केले का? मंत्री म्हणतात आतमध्ये हाणामारी झाली नाही शांतपणे बलात्कार पार पडला. हे गृहराज्यमंत्र्यांची भूमिका आहे मग काय करायला हवे? 200 पोलीस कामाला लागले पण यांची हिम्मत कशी होते हे सर्व करण्याची आणि खास करून पुण्यामध्ये. या पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहे त्यांना दादा म्हणतात त्यांच्याच राज्यात का घडत आहे कायद्याचा धाक राहिलेला नाही, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, पोलीस अन् कायद्याला कशाप्रकारे ही मॅनेज करू शकतो असा विश्वास गुंडांमध्ये आहे. पोलीस कायद्याला कशाप्रकारे ही मॅनेज करू शकतो असा विश्वास गुंडांमध्ये आहे. न्यायालयात हवा तो निर्णय घेऊ शकतो हा एक आत्मविश्वास आहे. राजकीय वरदहस्त लाभलेले हे मोकाट फिरतात. ते एकदा गुन्हेगा झाले की ते कोणाचे नसतात. कोणाच्याही व्यासपीठावर जाऊन फोटो काढतात. म्हणून अक्षय शिंदे एन्काऊंटर झाला. तेव्हा निवडणुका होत्या त्यामुळे अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर झाला. तो ठाणे जिल्ह्याचा होता आणि आता हा पुणे जिल्ह्याचा आहे जिल्ह्यानुसार कायदा बदलत असतो, अशा गंभीर शब्दांत खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संजय राऊत यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्व गुंडांची ओळख परेड घेतली होती. यावरुन टीका करताना खासदार संजय राऊत म्हणाले की, ज्या गुंडांची ओळख परेड झाली त्यांना त्यानंतर अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष या काळात काम केले. पोलीस आयुक्तांनी ज्यांची ओळख परेड केली होती मोठा इव्हेंट केला होता. ते सगळे गुंड भारतीय जनता पक्षाच्या प्रचारात आणि अजित पवार पक्षाच्या प्रचारात सक्रिय होते. तेव्हा त्यांची ओळख परेड आणि धिंड का काढली नाही हा आमचा प्रश्न आहे, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.