संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरातील पोलीस अधिकाऱ्यांना अवैध धंद्यावरून दमात धरणाऱ्या तसेच त्यांना वेठीस धरून आपली तुंबडी भरणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्यावर खडक पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे या कार्यकर्त्याला पोलीस आयुक्तालयात सहज प्रवेश मिळत होता. पण, नव्या आयुक्तांनाही तो अशाच पद्धतीने आरटीआय कार्यकर्ता व सामाजिक कार्यकर्ता म्हणून भेटण्यास गेल्यानंतर आयुक्तांनी त्यालाच चांगला दम भरला होता. नंतर त्यांची वेठीस धरण्याची धार कमी झाली होती. याप्रकरणी खडक पोलिसांत ललित सत्यवान ससाणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर यापुर्वी खडकी, चतुश्रृंगी आणि फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यामध्ये दोन गुन्हे खुनाच्या प्रयत्नाचे आणि आर्म ॲक्टचे आहेत. प्रसाद प्रकाश शेलार (३७, रा. घोरपडे पेठ) यांनी तक्रार दाखल केली आहे.
खडक पोलिसांच्या माहितीनूसार, तक्रारदारांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. ते १३ फेब्रुवारीला त्यांचे काका शेलार यांच्या वाढदिवसानिमीत्त घोरपडे पेठ येथे कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम झाल्यावर प्रमोद शेलार तेथून निघुन गेले. दरम्यान कार्यक्रमाला आलेले अभिषेक ससाणे व रोहन शेडगे हे घरी जाताना श्रीनाथ उर्फ टिक्या शेलार याला रस्त्यात भेटले. तेथे त्यांच्यात मारामारी झाली. याप्रकरणी अभिषेक ससाणेने खडक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. यामध्ये अभिषेक ससाणे हा प्रमोद शेलार यांचेसुध्दा नाव गुन्हयात घ्या असे खडक पोलीस ठाण्यात सांगत असल्याची तक्रारदार यांना माहिती मिळाली. त्यामुळे ते पोलीस ठाण्यात गेल्यावर तेथे अभिषेक ससाणेचा चुलत भाऊ ललित ससाणे सुध्दा होता त्याला तक्रारदाराने माझे काका शेलार याचा या गुन्हयाशी काहीएक संबंध नाही तुम्ही त्याचे नाव गुन्हयात ओढू नका अशी विनंती केली. त्यावर ललित ससाणेने गुन्हयात नाव न घेण्यासाठी ६ लाख रुपयांची मागणी केली.
पैसे न दिल्यास काका सहीत घरादाराला खोट्या केसेसमध्ये अडकवून देइल अशी धमकी दिली .पुढे तो असेही म्हणाला की, “तुम्ही प्रत्येक पोलीसांना माझी माहिती विचारा ते तुम्हाला माझ्याबद्दल सांगतील की, मी कोण आहे? कसा आहे? माझे पुणे शहरात मोठे संबंध आहेत. मी मोठ-मोठया पोलीस अधिका-यांना सस्पेंड करवले आहे. सगळे पोलीस मला दचकुन असतात, त्यामुळे मी केलेली पैशांची मागणी लवकरात लवकर पुर्ण करा, असे त्यांना म्हणाला. यानंतर तक्रारदारांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानूसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.