खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले (फोटो - सोशल मीडिया)
Sanjay Raut: मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज्यात जोरदार राजकारण तापले आहे. भाजपसह शिवसेनेचे दोन्ही गट, मनसे आणि इतर पक्ष कामाला लागले आहेत. पमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच एका कार्यक्रमात ठाकरे गटावर टीका केली आहे. घोडा मैदान जवळ आहे. ठिकऱ्या कोणाच्या उडतील हे ठाण्यातली जनता दाखवून देईल, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. त्यांना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत ठाण्यातील जनता तुमच्या गद्दारांच्याच ठिकऱ्या उडवल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच खासदार राऊत यांनी एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर देखील दिले आहे. ते म्हणाले की, इतक्या जागा जिंकूनही महाराष्ट्रात कुठेही जल्लोष झाला नाही. निवडणूक यंत्रणेला हाताशी धरुन, मतदार यादीत घोटाळे करुन, पैशांचा प्रचंड वापर करुन, यंत्रणा विकत घेऊन आपण जिंकलेले आहात. हे महापालिका निवडणुकीत चालणार नाही. निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय शिष्टमंडळाने हा पहिला हल्ला केला आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेटून निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांमधलं जे साटेलोटं आहे, हे उघड केलं आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी टीकास्त्र डागले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, या सर्वपक्षीय शिष्टमंडळात जे सर्व प्रमुख नेते त्यांची आपापसात चर्चा सुरु आहे. आता चर्चा एक पाऊल पुढे जाईल. निवडणूक आयोग दबावखाली काम करत आहे. आपण वारंवार निवदेन देतोय, पुरावे देतोय, तरीही निवडणूक आयोग ऐकायला तयार नसेल तर निवडणूक आयोगाला रस्त्यावर उतरुन दणका द्यावा लागेल, अशाप्रकारचे एकमत सर्वपक्षीय नेत्यांमध्ये होताना दिसत आहे, असे संजय राऊतांनी सांगितले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत म्हणाले की, कालच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली. शरद पवार, हर्षवर्धन सपकाळ यांच्यातही चर्चा सुरु आहे. निवडणूक आयोगाला सोडणार नाही. तसेच घोटाळे करणाऱ्यांनाही क्षमा केली जाणार नाही. त्यामुळे ठाणे आणि मुंबईत त्यांचे जे स्वप्न आहे की घोटाळा करुन पुन्हा निवडणूक यंत्रणा ताब्यात घ्यायची, त्यांना जाऊन सांगा की मुंबई, ठाण्यातील जनता तुमच्या गद्दारांच्याच ठिकऱ्या उडवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संजय राऊतांनी दिला.