वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची उदयनराजे भोसले यांची मागणी (फोटो -सोशल मीडिया)
पुणे : रायगडावर स्वराज्यनिर्माते छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी ही समाधीस्थळ एक तीर्थक्षेत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळच वाघ्या कुत्र्याचे समाधीस्थळ आहे. ही वाघ्या कुत्र्याची समाधी काढण्यावरुन राजकारण तापले आहे. ही समाधी काढून टाकण्यात यावी अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन्ही वंशज संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांनी केली आहे. उदयनराजे भोसले हे पुण्यामध्ये जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त फुले वाड्यामध्ये आले होते. यावेळी त्यांनी वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन निशाणा साधला आहे.
पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना उदयनराजे भोसले यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, ‘महाराजांबद्दल प्रेम असताना ब्रिटिशांनी पैसे दिले होते. महाराजांच्या समाधीसाठी पैसे दिले होते. ते कुत्र कुठून आलं होतं. त्यांनी हे केलं. कुठला वाघ्या अन् काय, कुत्र आलं कुठून? ते कुत्र पाहा, एवढ्या लांब कानाचं कुत्र कधी भारतात पाहिलं का? ही सगळी ब्रिटिशांची कुत्री होती. काढून टाका, फेकून टाका, कुठं एवढं कौतुक असायला पाहिजे. उद्या काय, द्यायचा दणका आणि कापून टाकायचं. एवढं काय किती विचार करायचा’, अशा शब्दांत उदयनराजेंनी वाघ्या कुत्रा हटवण्याची पुन्हा एकदा मागणी केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुंबईमध्ये समुद्रामध्ये होणाऱ्या स्मारकाबद्दल मत व्यक्त केले आहे. त्यांनी हे स्मारक समुद्रामध्ये न करता राजधानी दिल्लीमध्ये करण्याचा सल्ला दिला आहे. उदयनराजे भोसले म्हणाले की, “शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक दिल्लीत व्हावं. अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक व्हावं तिथे शक्य नसेल तर गव्हर्नर हाऊसच्या जागेत व्हावं. गव्हर्नर यांना राहण्यासाठी जागा लागतेच किती? 48 एकर जमीन आहे. त्या जागेत व्हायला हवं. याबद्दल मी अमित शहा यांच्याशी बोलणार आहे,” असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जोतिराव फुले यांनी पहिली शाळा सुरु केली नव्हती या आशयाचे वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केले. यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. उदयनराजे म्हणाले की, “सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरु केली असेल, तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली. एका दृष्टीकोनातून आपण पाहीलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते, त्यांचं महात्मा फुलेंनी अनुकरण केलं. स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरु केली असेल, तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली, ती देखील स्वत:च्या राजवाड्यात सुरु केली. त्या राजवाड्यात कालांतराने ज्यांनी देशाचं संविधान लिहीलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण त्याच राजवाड्यात झालं. थोरले प्रतापसिंह महाराज यांनी स्त्री शिक्षणाची शाळा सुरू केली,” असे उदयनराजे म्हणाल्यामुळे नवीन वाद सुरु झाला आहे.