राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली (फोटो - टीम नवराष्ट्र)
ठाणे : जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशदवादी हल्ला करुन अशांतता निर्माण करण्यात आली आहे. पहलगाम भागात भीषण दहशतवादी हल्ल्यात हिंदू पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये आतापर्यंत 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सहा महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्टनुसार या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या टीआरएफ म्हणजेच ‘द रेझिस्टंट्स फ्रंट’ ने घेतली आहे. यावर आता शरद पवार गटाचे आमदार व नेते जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा हल्ला काश्मीरमधील लोकांच्या पोटापाण्यावर पाय देण्यासाठी केला असल्याचे म्हणत कारवाईची मागणी केली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “हा दहशदवादी हल्ला भारतावरचा हल्ला आहे. काश्मीरची आर्थिक परिस्थिती सुधारत होती. काश्मीरमधील पर्यटकांची गर्दी वाढत होती. यामुळे काश्मीर पूर्वपदावर येत होते. लोक असे म्हणतात स्वित्झरलँड पेक्षा काश्मीर सुंदर आहे. हा पर्यटकांवरील हल्ला नाही हा काश्मीरी लोकांवरचा हल्ला आहे. पर्यटकांवरील हल्ला हा त्यांच्या पोटापाण्यावर प्रश्न निर्माण करणारा आहे. यात हिंदू मुसलमान काही प्रश्नच येत नाही,” असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे आव्हाड म्हणाले की, “त्या लोकांनी जे काही काय केलं हा नीच आणि घाणेरडा प्रकार आहे. गेल्या चार वर्षात मिलेक्ट्रीमध्ये भरती झालेली नाही. जवानांची संख्या दोन लाखांनी कमी झाली. काय जागतिक शांततेचा करार झाला होता का? आपल्यावर पाकिस्तान बांगलादेश आपले जे दुश्मन राष्ट्र आहेत यांच्यातून कारवाया होणार नाही असा गोड गैरसमज झाला होता का? जेवण एक वेळेस कमी केलं तरी चालेल पण देशाचा सीमाभाग सुरक्षित राहिला पाहिजे. त्याठिकाणी एकही पोलीस किंवा मिलिटरीचा माणूस नव्हता. ते सगळे झाल्यानंतर नंतर आले. कडक मिलिटरी बंदोबस्त असेल तर अतिरेकी कारवाया होत नाहीत. आपल्या गुप्तचर विभागाचा पराभव आहे,” अशी टीका देखील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
पहलगाम दहशदवादी हलल्यासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “दहशदवादी हल्ल्यावरुन राजकारण करायचं नाही. या हल्ल्याचा निंदा करूया. आपलं राष्ट्र आणि आपलं सरकार जी काही भूमिका घेईल त्याच्या मागे उभा राहूया. ज्या लोकांनी काश्मीरला मागे घेण्याचा प्रयत्न केलाय त्यांना काश्मीरीच उत्तर देईल. काश्मीरी जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे. पहलगाम जिथे हल्ला झाला तिथे यापूर्वी कधीच हल्ला झाला नाही. पहलगाम ही पर्यटकांची सगळ्यात आवडती जागा आहे. काश्मीर पायावर उभे राहतंय त्यांना लूळ करण्याचा हा डाव आहे. जातीय धर्मीय द्वेष पसरवला जातो. भारतामध्ये एकता निर्माण होते त्याला सुरुंग लावण्याचा हा प्रयत्न आहे. काश्मीरला लुळ पांगळा करण्याचा हा आंतरराष्ट्रीय कट आहे याच्यात पाकिस्तान सामील आहे,” असा गंभीर दावा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.