दापोलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश; योगेश कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत 'धनुष्यबाण' हाती (फोटो - सोशल मीडिया)
दापोली : राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अनेक नेते-कार्यकर्ते आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. असे असताना आता दापोली तालुक्यातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हा प्रवेश करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
गेल्या काही काळात योगेश कदम यांच्या कार्यशैलीने आणि विकासाभिमुख धोरणांनी अनेक कार्यकर्त्यांना आकर्षित केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त करत विविध पक्षांतील कार्यकर्ते शिवसेनेकडे वळत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन मुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका युवक अध्यक्ष विजय मुंगशे, पिंट्या माने, आसूदचे उपसरपंच राकेश माने, आंजर्लेचे सरपंच मेघना मंगेश पवार, उपसरपंच प्रथमेश केळस्कर, वैभव धामणे, शिल्पा माने, संजना केळस्कर, स्वप्निल कलमकर, सिद्धी संदीप पवार आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
योगेश कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास
या सर्वांनी योगेश कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पक्षाच्या विचारधारेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई, दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कृपा घाग, नदीम मुकादम, सुनिल दळवी, भगवान घाडगे, पप्पु रेळेकर, स्वरुप महाजन, सुधीर कालेकर, रोहिणी दळवी, दिप्ती निखार्गे आदी उपस्थित होते.
भाजप-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
दुसरीकडे, जत शहराच्या राजकारणात रोज नवनवीन उलथापालथ होत असल्याचे दिसून येत आहे. जतच्या राजकारणाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना घडली. भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षांतील मोठ्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. दोन विद्यमान नगरसेवकांसह विविध पक्षांच्या प्रभावी कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे हाती घेतलेले निशाण, आगामी जत नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस पक्षासाठी शुभ संकेत मानले जात आहेत.
हेदेखील वाचा : Rajya Sabha Election : पक्षांतर्गत कलहामुळे काँग्रेसचे समीकरण बिघडलं; आता प्रतिष्ठेची बनली लढाई






