ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केले होते असा मराठा समाजाने आरोप केला होता. त्यांचा आता मेडिकल रिपोर्ट समोर आला आहे. (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा तरुणांमध्ये पुण्यामध्ये वाद विवाद झाल्याचे दिसून आले. कोंढवा परिसरामध्ये हा प्रकार घडला असून सोशल मीडियावर याचा व्हिडिओ अवघ्या काही वेळात तुफान व्हायरल झाला. लक्ष्मण हाके यांनी दारु पिले असल्याचा आरोप मराठा समाजातील तरुणांनी केला. या प्रकरणावरुन जोरदार राजकारण रंगले आहे. यानंतर पुण्यातील ससून सर्वौपचार रुग्णालयामध्ये त्यांची मेडिकल टेस्ट करण्यात आली होती. आता या मेडिकल रिपोर्ट समोर आले आहे.
मराठा आरक्षण ओबीसीमधून देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. अंतरवलीमध्ये जरांगेचे उपोषण सुरु असताना ओबीसी नेते म्हणून लक्ष्मण हाके यांनी देखील उपोषण केले. मराठा आरक्षण ओबीसीमधून देण्यास विरोध केला होता. त्यानंतर लक्ष्मण हाके आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये वादंग निर्माण झाला. पुण्यामध्ये लक्ष्मण हाके हे मद्यप्राशन करत शिवीगाऴ केल्याचा आरोप का मराठा बांधवांनी केला. व्हायरल व्हिडिओमध्ये लक्ष्मण हाके यांना मराठा तरुण हाताला धरुन नेत असल्याचं दिसून आलं आहे. तर मराठा तरुणांनी मारहाण केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. लक्ष्मण हाके यांच्या तक्रारीनुसार 20 ते 25 मराठा समाजील तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता लक्ष्मण हाके यांचा मेडिकल रिपोर्ट आला आहे.
काय आहे मेडिकल रिपोर्ट?
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची ससुन रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यामध्ये प्राथमिक अहवालामध्ये हाके यांनी दारु पिलेली नव्हती असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे. मात्र आणखी खात्रीशीर रिपोर्टसाठी लक्ष्मण हाके यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहे. रक्ताचे नमुने हे चाचणीसाठी वैद्यकिय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले असून याचा अहवाल येत्या एक ते दोन दिवसांमध्ये मिळत आहे. पुण्यामध्ये हा प्रकार घडला असून आता लक्ष्मण हाके हे काल रात्री नागपुरला रवाना झाले आहेत. नागपूरमध्ये लक्ष्मण हाके यांची पूर्वनियोजित सभा आहे. त्यानंतर आज काल घडलेल्या प्रकाराबाबत ते पत्रकार परिषद घेणार आहेत.
हे देखील वाचा : निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का; बडा नेता देणार सोडचिठ्ठी
काय म्हणाले लक्ष्मण हाके?
या प्रकरणाबाबत लक्ष्मण हाके यांनी गंभीर आरोप केला आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल आणि व्हिडिओबद्दल मत व्यक्त करताना हाके म्हणाले की, कोंढव्यामध्ये दोन तरुणांनी माझ्याकडे येऊन चर्चा केली आणि तेच तरुण काही वेळाने काही लोकांचा जमाव घेऊन माझ्याकडे आले. माझे दोन्ही हात पकडून मला एकाच जागेवर थांबवून ठेवले. त्यावेळी मी पोलिसांना फोन केला आणि सर्व परिस्थिती सांगितली. त्यामुळे एकूणच प्रकरण पाहिल्यावर, मला जीवे मारण्याचा पूर्वनियोजित कट होता, असा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे.