मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा; शरद पवार गटाच्या खासदाराची फडणवीसांसोबत भेट; रोहित पवारांचा मोठा दावा
राज्यात शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांच्या फुटीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच आता ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पक्षातील खासदार फुटणार नसल्याचा ठाम दावा केला आहे.
शेतकरी कर्जमाफीच्या जनजागृती दौऱ्यावर बीडमध्ये माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले की, भाजपकडून विरोधी पक्षांतील खासदारांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष आणि समाजवादी पक्षाचा एकही खासदार पक्ष सोडणार नाही, असा त्यांना पूर्ण विश्वास आहे.
ते म्हणाले की, लोकसभा मतदारसंघांच्या संभाव्य पुनर्रचनेसाठी (डिलिमिटेशन) भाजपला आणखी ४१ खासदारांची गरज असल्याची चर्चा आहे. मात्र त्यासाठी विरोधी पक्षांतील खासदारांना फोडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही.
‘गद्दार खासदार जिथे सापडतील तिथेच..’; उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना थेट आदेश, भाजपवरही घणाघात
रोहित पवार यांनी बजरंग सोनवणे यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीबाबतही स्पष्टीकरण दिले. त्यांच्या मुलावर होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री, तसेच राज्याचे गृहमंत्री म्हणून फडणवीस यांची भेट घेतली असावी, असे रोहित पवार म्हणाले.
त्यांनी स्पष्ट केले की, या भेटीचा पक्षांतराशी संबंध जोडणे योग्य ठरणार नाही आणि राज्यात ‘ऑपरेशन तुतारी’सारखे कोणतेही राजकीय अभियान यशस्वी होणार नाही.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडे एकूण ९ खासदार आहेत. त्यापैकी ८ लोकसभा आणि १ राज्यसभा खासदार आहेत. लोकसभेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते-पाटील, अमर काळे, बजरंग सोनवणे, निलेश लंके, भास्कर भगरे आणि सुरेश म्हात्रे हे पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहेत. तर शरद पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत.






